सौताडा घाट परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सौताडा घाट परिसरासह जामखेड तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीत बिबट्याचा वावर आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साकत, सावरगाव, शिऊर, देवदैठण, दिघोळ, मोहरी, धामणगाव, तेलंगशी, मोहा तसेच भुतवडा डोंगर परिसरात बिबट्या दिसून आल्याची चर्चा असून, या भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सौताडा घाट परिसर हा डोंगराळ व झाडीचा भाग असल्याने वन्यप्राण्यांच्या वावरासाठी पोषक वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याच्या हालचाली जाणवत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक तसेच डोंगर परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विशेषतः पहाटे व सायंकाळच्या वेळी शेतात जाणाऱ्या नागरिकांनी एकट्याने जाणे टाळावे. शेतातील जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर किंवा शेत परिसरात विनाकारण फिरणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
बिबट्या किंवा त्याच्या हालचाली आढळल्यास नागरिकांनी त्याच्या जवळ जाण्याचा, पाठलाग करण्याचा किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये. सोशल मीडियावर अफवा किंवा अपुऱ्या माहितीवर आधारित संदेश प्रसारित न करता संबंधित वनविभागाला माहिती देणे आवश्यक आहे.
दरम्यान, या परिसरातील बिबट्याच्या वावराची वनविभागाने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने संवेदनशील भागात गस्त वाढवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.