नागपंचमी यात्रेनिमित्त जामखेडमध्ये भरविण्यात आलेल्या भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानात पै. रविराज चव्हाण यांनी पै. महारुद्र कळेज यांच्यावर गिस्सा डावाने मात करत मानाची पहिली कुस्ती जिंकली. रविराज चव्हाण आंतरराष्ट्रीय आखाडा, पुणे आणि महारुद्र कळेज, कुर्डवाडी यांच्यातील ही लढत अत्यंत रोमहर्षक झाली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या कुस्तीने उपस्थित कुस्तीशौकिनांची चांगलीच दाद मिळवली.
नागपंचमी यात्रेनिमित्त सलग २४ व्या वर्षी कै. विष्णू उस्ताद काशीद बाबा प्रतिष्ठानच्या वतीने, अजयदादा काशीद मित्र परिवाराच्या आयोजनातून जामखेड महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे मैदान भरविण्यात आले. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील नामवंत मल्लांनी या मैदानात सहभाग घेत विविध कुस्त्यांचे प्रदर्शन केले.मैदानातील पहिली मानाची कुस्ती पै. रविराज चव्हाण आणि पै. महारुद्र कळेज यांच्यात झाली.
दोन्ही मल्लांनी सुरुवातीपासूनच आक्रमक डावपेचांचा वापर करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. अखेर रविराज चव्हाण यांनी गिस्सा डाव साधत महारुद्र कळेज यांच्यावर मात केली आणि मानाची पहिली कुस्ती आपल्या नावावर केली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. मोईन पटेल विरुद्ध मुसा पहेलवान यांच्यात झाली. या लढतीत मुसा पहेलवान विजयी ठरले. तिसऱ्या कुस्तीत रोहित दैय्या आणि शाहरुख खान आमनेसामने आले. त्यामध्ये शाहरुख खान यांनी विजय मिळवला. याशिवाय मैदानात झालेल्या अनेक रोमहर्षक लढतींनी जामखेडकरांचे लक्ष वेधून घेतले.
आखाड्यातून राम शिंदेंचा राजकीय टोला या कुस्ती मैदानाला महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व अन्य क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रा. राम शिंदे यांनी कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय भाष्य करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मागील वर्षी अर्धवट राहिलेल्या कुस्तीचा संदर्भ देत, संबंधित मल्लांना पुन्हा पुढील वर्षी आखाड्यात बोलावून “दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या; मग कोण कुणाला पाणी पाजतो हे जामखेडच्या जनतेला कळू द्या,” अशा आशयाचा राजकीय टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्याची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.
मान्यवरांचा सत्कार; सामाजिक उपक्रमालाही जोड
अजयदादा काशीद मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबवले जातात. यंदाही गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल साळुंके सर यांचा सत्कार करण्यात आला. मैदानाच्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठी स्वतंत्र स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. विविध क्षेत्रांतील मान्यवर, कुस्तीप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
मिरवणुकीने रंगत वाढवली कुस्तीचे मैदान सुरू होण्यापूर्वी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ‘मराठा गौरव’ युवराज भाऊ काशीद यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. पारंपरिक उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि कुस्तीप्रेमींच्या गर्दीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
जामखेडची नागपंचमी यात्रा पारंपरिक चाळ, टाळ आणि कुस्तीच्या आखाड्यासाठी राज्यभर परिचित आहे. गेल्या २४ वर्षांपासून कै. विष्णू उस्ताद काशीद बाबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरविण्यात येणाऱ्या या निकाली कुस्त्यांच्या मैदानामुळे जामखेडच्या नागपंचमीला आणखी वेगळी ओळख मिळत आहे. अजयदादा काशीद यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य मैदानामुळे कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.