जामखेड न्युज – – – – –
जामखेडच्या श्री नागेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय सांगता
काल्याच्या कीर्तनाची सेवा शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांना मिळाली
जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर येथे नागपंचमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सहा दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात उत्साहात सांगता झाली. सप्ताहाच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर हरिनामाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या सप्ताहात संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनकार्यावर आधारित कथा वाचन, हरिनाम संकीर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दररोज मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून कथा, कीर्तन व संकीर्तनाचा लाभ घेतला. धार्मिक कार्यक्रमांमुळे श्री नागेश्वर मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
सप्ताहाची सांगता वाणीभूषण ह.भ.प. चेतन महाराज बोरसे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यांच्या रसाळ व ओघवत्या वाणीतून सादर झालेल्या कीर्तनाने उपस्थित भाविक भक्तिरसात तल्लीन झाले. कीर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या काल्याच्या कीर्तनाची सेवा शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांना मिळाली. त्यांनी दिलेल्या सेवाभावी योगदानाबद्दल श्री नागेश्वर सेवा समितीच्या वतीने आकाश बाफना यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळे सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला अधिक भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले.



