जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून शाश्वत शेळीपालन हे अत्यंत किफायशीर असे ठरते. राज्यातील शेळ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त जात आहे.”
असे प्रतिपादन अखिल भारतीय समन्वित संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्प , महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पशुवैदयकीय अधिकारी डॉ. सुरेश शेंडगे यांनी केले.
कर्मवीर वाघ शिक्षण संस्था संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद़योगिकता कार्यक्रमातंर्गत शाश्वत शेळीपालन व्यवसाय या विषयावर ऑनलाइन शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.सुरेश शेंडगे, पशुवैद्यकीय अधिकारी, अखिल भारतीय समन्वित संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी हे लाभले होते.
डॉ. शेंडगे म्हणाले की, शाश्वत शेळी पालनाचे चार घटक आहेत. व्यवस्थापन, आहार ,पैदास व आरोग्य यामध्ये जनावराची निवड करताना “जावई” हा मूलमंत्र लक्षात ठेवावा ज- जात, व -वय , ई – ईश्ट गुणधर्म.
आहार व्यवस्थापन करताना शेळीला सहा ते आठ तास चारण गरजेचं आहे. तसेच तसेच चाऱ्याचा तुटवडा असल्यास एक किलो हिरवा, 500 ग्रॅम वाळलेला चारा रात्री द्यावा. याचबरोबर दररोज 350 ग्रॅम पशुखाद्य द्यावे.
गोठा उभारणी करताना, गोठ्याची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी. गोठ्याचे छत आकाराचे ठेवावे. छताच्या मध्यभागी उंची 12 ते 15 फूट व कडेला आठ ते दहा फूट ठेवावी.
आरोग्य व्यवस्थापनामध्ये वेळेवर लसीकरण करणे गरजेचे आहे. पीपीआर घटसर्प लाळ खुरकत व आंत्रविषार या रोगासाठी लसीकरणाचे वेळापत्रक पाळावे असा सल्ला डॉ. शेंडगे यांनी दिला. याच बरोबर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंका आणि समस्यांचे निराकरण देखील केले.
ऑनलाईन शेतकरी मेळाव्या मध्ये सुमारे 250 शेतकऱयांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. एस. एम. हाडोळे यांसह ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषि औद्योगिकता कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार व प्रा. सुनील बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी अक्षदा बूरकूल, हर्षदा वसावे, कोमल उदमले, प्राची वाघमारे, ऐश्वर्या शिरसाट यांनी सहकार्य केले