जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांची मुख्याधिकारी वर्ग-२ पदावरून मुख्याधिकारी वर्ग-१ पदावर पदोन्नती झाली असून, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने त्यांच्याकडे पुन्हा जामखेड नगरपरिषदेचा कार्यभार सोपविला आहे.
या पदोन्नतीबद्दल जामखेड नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी कार्यालयात त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भावी प्रशासकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कामाचा ठसा, शासनाची पसंती अजय साळवे यांनी जामखेड नगरपरिषदेत कार्यरत असताना स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियान, पाणीपुरवठा योजना, रस्ते-गटार विकासकामे, मालमत्ता कर वसुली, ई-गव्हर्नन्स अशा विविध विकासकामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. नागरिकाभिमुख व पारदर्शक प्रशासकीय सुधारणा राबवून त्यांनी आपली स्वतंत्र कार्यशैली निर्माण केली आहे.
त्यांच्या कार्यक्षम कामकाजाची व नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत शासनाने त्यांना वर्ग-१ मुख्याधिकारी पदावर पदोन्नती देत पुन्हा जामखेड नगरपरिषदेची जबाबदारी सोपविली आहे, ही बाब जामखेडकरांसाठी अभिमानास्पद आहे.
सत्काराला मान्यवरांची उपस्थिती यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, सचिव, कार्यालयीन अधीक्षक, लेखापाल अभियंता, तसेच सर्व विभागप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साळवे यांच्या शिस्तबद्ध, लोकाभिमुख व निर्णयक्षम कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला. “सामान्य नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडवण्याची त्यांची हातोटी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत प्रेरणादायी आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
मुख्याधिकारी साळवे यांचे मनोगत सत्काराला उत्तर देताना मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले, “ही पदोन्नती माझी एकट्याची नसून संपूर्ण जामखेड नगरपरिषद टीमच्या सांघिक कामाचे फळ आहे. शासनाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जामखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी कटिबद्ध राहीन. स्वच्छ, सुंदर व स्मार्ट जामखेड घडवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.”
नागरिकांतून आनंद वर्ग-१ पदावर पदोन्नती होऊनही साळवे यांच्याकडेच जामखेडचा कार्यभार कायम राहिल्याने शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.