प्राचार्यपदाची धुरा व योगाचा प्रचार : डॉ. केळकर-पारखे यांचा ‘कर्तृत्व सन्मान’
प्रा. डॉ. गौतम केळकर व प्राचार्य बाळासाहेब पारखे यांचा खास सन्मान
प्रा. डॉ. गौतम दशरथ केळकर यांनी जामखेड महाविद्यालय जामखेड च्या प्रभारी प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल वप्राचार्य बाळासाहेब पारखे यांची राज्यस्तरीय ‘योग क्रीडा पंच’ म्हणून निवड झाल्याबद्दल ज्ञान व योगाचा संगम म्हणजे प्राचार्य केळकर व पंच पारखे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
जामखेड महाविद्यालय जामखेड येथे जाऊन प्रभारी प्राचार्य डॉ. गौतम केळकर यांचा माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट व कला अध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष मयुर भोसले, प्रा. राहुल भाकरे, प्रा. किरदात यांनी सन्मान केला. तसेच प्राचार्य बाळासाहेब पारखे यांची राज्यस्तरीय योग क्रीडा पंच म्हणून निवड झाल्याबद्दल ल. ना. होशिंग विद्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक अनिल देडे, प्रा. विनोद धुमाळ, रामचंद्र होशिंग, सुदाम वराट, मयूर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. गौतम दशरथ केळकर यांच्या विषयी
प्रा. डॉ. गौतम दशरथ केळकर हे शिक्षण, संशोधन आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आहेत. दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालयात त्यांनी गेल्या १७ वर्षांपासून प्राध्यापक म्हणून अत्यंत समर्पितपणे कार्य केले आहे. सध्या ते महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.
भूगोल विषयातील तज्ज्ञ असलेल्या डॉ. केळकर यांनी M.A., B.Ed., Ph.D. तसेच NET ही शैक्षणिक पात्रता संपादन केली आहे. अध्यापनासोबतच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देत अभ्यासक्रमावर आधारित दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. तसेच विविध संशोधनपर लेख, संशोधन निबंध आणि पेटंटच्या माध्यमातून ज्ञानवृद्धीस हातभार लावला आहे.
राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाचे ते गेल्या १५ वर्षांपासून प्रमुख म्हणून कार्यरत असून, त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वामुळे त्यांना “उत्कृष्ट NCC अधिकारी” हा सन्मान प्राप्त झाला आहे. NCC च्या माध्यमातून त्यांनी समाजाभिमुख उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि राष्ट्रसेवेच्या विविध कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली १०० हून अधिक कॅडेट्सनी भारतीय सैन्य, पोलीस दल, CRPF, SRPF, SSB यांसारख्या विविध सुरक्षा दलांमध्ये यशस्वी प्रवेश मिळविला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रेरणादायी कार्य केले आहे.
ल. ना. होशिंगचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांची राज्यस्तरीय ‘योग क्रीडा पंच’ म्हणून निवड
भारतीय योग महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य योग समितीतर्फे नुकतीच लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत उत्तम कामगिरी करत ल. ना. होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य योगगुरु बाळासाहेब आप्पा पारखे यांची राज्यस्तरीय योग क्रीडा पंच’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्राचार्य बाळासाहेब पारखे यांची महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनमार्फत ‘योग क्रीडा राज्य पंच’ म्हणून निवड झाली आहे. पुणे येथील केब्रीज इंटरनॅशनल स्कूल मधे पार पडलेल्या राज्यस्तरीय पंच परीक्षेत लेखी व प्रात्यक्षिक अशा दोन्ही टप्प्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली यामुळे राज्यस्तरीय पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्राचार्य बाळासाहेब पारखे यांना राज्यस्तरीय पंच म्हणून प्रमाणपत्र देताना राजस्थानचे योग गुरू ढोकरामजी महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष गवते सचिव पांगरे यांच्या सह अनेक योग तज्ञ शिक्षक उपस्थित होते.
“योग हा आता खेळ प्रकारात समाविष्ट झाला आहे. खेळात पारदर्शकता येण्यासाठी प्रशिक्षित पंचांची गरज आहे. ही जबाबदारी मिळाली याचा आनंद आहे. जामखेडसारख्या ग्रामीण भागातील मुलांना योगासनात करिअर करता यावे यासाठी मी प्रयत्न करणार,” अशी प्रतिक्रिया प्राचार्य पारखे यांनी दिली.