अधिकारी म्हटले की रुबाब, पदाचा दरारा आणि शासकीय वाहनांचा ताफा असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, पदाचा मोठेपणा बाजूला ठेवून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारा अधिकारी भेटला तर तो प्रसंग कायम स्मरणात राहतो. असाच एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी अनुभव जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धनगरवस्ती येथे पाहायला मिळाला.
अहिल्यानगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी या शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत, ‘तुम्हाला मोठे झाल्यावर काय बनायचे आहे?’ असा प्रश्न विचारला. त्यावर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकाच आवाजात, ‘आम्हाला कलेक्टर व्हायचंय!’ असे उत्तर दिले. विद्यार्थ्यांच्या या निरागस उत्तराने भारावून गेलेल्या हिंगे साहेबांनी त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांच्या मनातील कलेक्टर पदाविषयीची उत्सुकता आणि आकर्षण अधिक वाढावे, यासाठी त्यांनी शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना गटागटाने आपल्या शासकीय लाल दिव्याच्या गाडीतून सफर घडवली. ज्या पदाचे स्वप्न ही मुले पाहत आहेत, त्या पदावरील अधिकाऱ्याच्या शासकीय वाहनात बसण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.
तीन तास विद्यार्थ्यांच्या विश्वात रमले साहेब! विशेष म्हणजे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केवळ औपचारिक भेट देऊन निघून जाण्याऐवजी तब्बल तीन तास शाळेत घालवले. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, त्यांच्या आनंदात सहभागी झाले आणि चक्क मुलांसोबत लेझीमच्या तालावर ठेकाही धरला. यावेळी मंडलाधिकारी काळे, शिरसाट तलाठी मॅडम तसेच धनगरवस्ती शाळेचे शिक्षक लहू बोराटे उपस्थित होते.
मोठ्या पदावर कार्यरत असलेला अधिकारी विद्यार्थ्यांमध्ये इतक्या सहजपणे मिसळल्याने शाळेतील वातावरण आनंदाने भारावून गेले. सध्या परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याची जाणीव ठेवत त्यांनी कोणताही औपचारिक सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तर अधिकारी म्हणून वेगळे आसन न घेता विद्यार्थ्यांच्या पंगतीत जमिनीवर बसून शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. त्यांच्या या साधेपणाने उपस्थित शिक्षक आणि ग्रामस्थांची मने जिंकली.
स्थलांतरित विद्यार्थ्यांचीही घेतली आस्थेने विचारपूस! ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या कुटुंबांतील समाधान आणि समर्थ या विद्यार्थ्यांच्या पालकांचीही त्यांनी विशेष आस्थेने चौकशी केली. शिक्षणापासून कोणतेही मूल वंचित राहू नये, यासाठी अशा विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवणे किती महत्त्वाचे आहे, याची प्रचिती त्यांच्या संवेदनशील वागणुकीतून आली. लोकसहभागातून धनगरवस्तीच्या शाळेने केलेला कायापालट पाहून अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे प्रभावित झाले. मर्यादित सुविधा आणि ग्रामीण भागातील आव्हाने असतानाही शाळेने लोकसहभागाच्या बळावर उभा केलेला शैक्षणिक विकास निश्चितच कौतुकास्पद असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले. मुख्याध्यापक लहु बोराटे यांनी शाळेच्या प्रगतीची आणि लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
पद मोठे असण्यापेक्षा मन मोठे असणे महत्त्वाचे असते, याचा प्रत्यय या भेटीतून आला. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना केवळ शब्दांनी शुभेच्छा न देता त्यांना प्रत्यक्ष अनुभव देणारे शैलेश हिंगे यांचे हे वर्तन निश्चितच प्रेरणादायी आहे. कलेक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या चिमुकल्यांच्या मनात आजचा दिवस नवी उमेद, नवा आत्मविश्वास आणि मोठे होण्याची जिद्द निर्माण करणारा ठरला आहे.
एका अधिकाऱ्याच्या तीन तासांच्या सहवासाने धनगरवस्तीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात आयुष्यभर पुरेल अशी आठवण निर्माण केली. खऱ्या अर्थाने हा केवळ अधिकाऱ्यांचा शाळा दौरा नव्हता, तर भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वप्नांना मिळालेली प्रेरणेची भरारी होती!