जामखेडमध्ये जनतेच्या प्रश्नांसाठी ‘समता जनता दरबार’ सुरू! अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा पुढाकार जमिनीचे वाद, कौटुंबिक तंटे अन् महिलांच्या समस्यांवर पहिल्याच दिवशी सुनावणी, १५० हून अधिक नागरिकांची उपस्थिती
जामखेडमध्ये जनतेच्या प्रश्नांसाठी ‘समता जनता दरबार’ सुरू! अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा पुढाकार
जमिनीचे वाद, कौटुंबिक तंटे अन् महिलांच्या समस्यांवर पहिल्याच दिवशी सुनावणी, १५० हून अधिक नागरिकांची उपस्थिती
जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य, गोरगरीब, वंचित आणि अन्यायग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी जामखेडमध्ये ‘समता जनता दरबार’ या अभिनव उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि कौटुंबिक समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामीण विकास केंद्र संस्थेत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जामखेड नगरसेवक गटनेते ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनता दरबार सुरू करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी जमिनीचे वाद, कौटुंबिक तंटे तसेच महिलांसंबंधी काही समस्यांवर मार्ग काढण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेच्या सुरेखाताई सदाफुले, ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमाताई जाधव, नगरसेविका संगीताताई भालेराव आणि छबुबाई पुलावळे यांच्या हस्ते संविधानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हर्षल डोके होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून बापूसाहेब ओहोळ यांनी समता जनता दरबाराची संकल्पना, उद्देश आणि कार्यपद्धती स्पष्ट केली. यावेळी सुरेखाताई सदाफुले, उमाताई जाधव, ह.भ.प. ॲड. महारुद्र नागरगोजे महाराज, छबुबाई पुलावळे, विजय कुलकर्णी, उत्तम सावंत, विशाल पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे, केंद्रप्रमुख राम निकम, पत्रकार धनराज पवार, पत्रकार लियाकत शेख आणि नवउद्योजक शुभम जाधव यांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव म्हणाले की, ‘समता’ म्हणजे समाजातील सर्व जाती, धर्म, पंथ, गरीब, दिव्यांग, अनाथ, महिला, वृद्ध तसेच अन्यायग्रस्त आणि पीडित अशा सर्व घटकांसाठी खुले असलेले न्यायाचे व्यासपीठ आहे. सर्वसामान्य माणसाला आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी सहज उपलब्ध होणारे व्यासपीठ निर्माण करणे, हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. गोरगरीब जनतेसाठी हाच जनता दरबार म्हणजे लोकसभा, विधानसभा आणि विधानपरिषद असेल. जामखेड तालुक्यासह ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, उद्घाटनाच्या दिवशीच काही नागरिकांच्या जमिनीच्या वादांवर, कौटुंबिक तंट्यांवर तसेच महिलांच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. हर्षल डोके यांनी समता जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्यासोबत काम करणार असल्याचे सांगितले. ह.भ.प. ॲड. महारुद्र नागरगोजे महाराज यांनीही या उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. या उद्घाटन सोहळ्यास जामखेड, कर्जत, श्रीगोंदा आणि पाटोदा तालुक्यांतील भटके-विमुक्त, दलित, आदिवासी समाजातील नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण विकास केंद्राचे कार्यकर्ते सचिनदादा भिंगारदिवे, ऋषिकेश गायकवाड, सागर कांबळे, सागर शिंदे, निताताई इंगळे, विशाल पवार, राहुल पवार, भक्ती, मीराताई जगताप, गौतमी गंगावणे, पल्लवीताई ढोलगे, रजनीताई औटी, पायलताई मुळेकर आदींसह सुमारे १५० हून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम शिंदे सर यांनी केले, तर रजनीताई औटी यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वसामान्यांच्या समस्या, वंचितांचे प्रश्न आणि अन्यायग्रस्तांच्या तक्रारींना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेला समता जनता दरबार आगामी काळात कितपत प्रभावीपणे काम करतो, याकडे आता जामखेड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.