जामखेड न्युज – – – – – –
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६
१८ जून रोजी मतदान तर २२ जूनला मतमोजणी, जिल्ह्य़ात आचारसंहिता लागू

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर केली असून अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली आहे. निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दत्तात्रय कवितके, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, या निवडणुकीसाठी दि. २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून दि. १ जूनपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. दि. २ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून दि. ४ जून ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत राहणार आहे. दि. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. तर २२ जून रोजी मतमोजणी होऊन २५ जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

नामनिर्देशनपत्रे जिल्हाधिकारी यांचे दालन, दुसरा मजला जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही विधानसभा मतदारसंघात नाव असणे बंधनकारक असून त्याची साक्षांकित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट, नगरपरिषदा व नगरपंचायतींचे सदस्य मतदार म्हणून सहभागी होणार आहेत. अहिल्यानगर महानगरपालिका, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, श्रीगोंदा, शिर्डी, शेवगाव, कर्जत, अकोले, जामखेड व पारनेर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा या निवडणुकीत मतदार म्हणून समावेश आहे. एकूण ४६१ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

