जामखेडमध्ये कांद्याचा संताप उसळला! खर्डा चौकात शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी जामखेड शहरातील खर्डा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले.
कांद्याला हमीभाव जाहीर करावा, सरकारी खरेदी तात्काळ सुरू करावी, निर्यात बंदी हटवावी, नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.आंदोलनामुळे खर्डा चौक परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते मंगेश आजबे म्हणाले, कष्टाने पिकवलेल्या कांद्याला योग्य भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळेपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. सरकारने तात्काळ बाजार समितीत थेट खरेदी सुरू करून व्यापाऱ्यांची मनमानी थांबवावी. शेतकरी वाचला तरच देश वाचेल.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात,प्रा.कुंडल राळेभात,प्रसन्न कात्रजकर,चिराग आजबे,गणेश हगवणे आदींनी मनोगत व्यक्त केले.
आंदोलनादरम्यान कांद्याला योग्य भाव द्या,शेतकरी वाचवा,निर्यात बंदी हटवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कांद्याला किमान २५ रुपये प्रति किलो दराने बाजार समितीत खरेदी करण्यात यावी तसेच यापूर्वी विक्री केलेल्या कांद्यालाही अनुदान द्यावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.यावेळी नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या आंदोलनात जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, राजेंद्र कोठारी, मंगेश आजबे,रमेश आजबे, सागर कोल्हे, शेतकरी नेते सुनील लोंढे, नगरसेवक राजेंद्र गोरे, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, प्रा. कैलास वराट, युवा नेते प्रा. कुंडल राळेभात, वसिम सय्यद, माजीद कुरेशी,गणेश हगवणे,डॉ. कैलास हजारे, समिर पठाण, संतोष निगुडे, भिमराव पाटील,हरिभाऊ आजबे, चिराग आजबे, बापूसाहेब कार्ले, इस्माईल सय्यद, युवराज उगले, प्रसन्न कात्रजकर,नागेश कात्रजकर, सिध्देश्वर लटके,सचिन शिंदे, बजरंग डूचे, अनिल रेडे, सागर जगताप, बिलाल शेख, सागर भोसले, रामहरी गोपाळघरे, अनिल अडाले, दत्ता डिसले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.