बांधखडक शिक्षणोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न, सौ.चंपाबाई कल्याण वारे ठरल्या लकी ड्रॉ ‘पैठणी’च्या भाग्यवान विजेत्या
शिक्षणप्रेमी व दानशूर ग्रामस्थांनी केले ‘लाख’मोलाचे सहकार्य
मागील तीन वर्षांपासून विविध नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी उपक्रमांचा समावेश असलेला ‘बांधखडक शिक्षणोत्सव’ याही वर्षी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने बुधवार दिनांक ८एप्रिल २०२६रोजी यशस्वीपणे पार पडला. सकाळी ९:००ते १०:३० या दरम्यान आनंदी बाजार अर्थात बाल आनंद मेळाव्याने शिक्षणोत्सवाचा श्रीगणेशा झाला.इ.३री ते ५वीच्या विद्यार्थ्यांनी वडापाव,डोसा, लस्सी, गुलाब जामुन, सरबत इ.विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून सुमारे १५,२५२रू.ची आर्थिक उलाढाल बाल व्यावसायिकांनी केली.गर्दीने फुलून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या या आनंदी बाजाराला जणू जत्रेचे स्वरूप आले होते.
बाल आनंद मेळाव्यानंतर नान्नज बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती पार्वती गाडेकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या बांधखडक शाळेच्या मुलींच्या खो-खो संघातील १२ विद्यार्थीनींना माता पालक सदस्यांच्या सौजन्याने प्राप्त झालेले ‘स्पोर्टस शूज’ तर जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित ‘मिशन आरंभ’ परीक्षेत पात्र ठरलेल्या बांधखडक, वनवेवस्ती व चव्हाणवस्ती शाळांतील इ.४थीच्या एकूण ७विद्यार्थ्यांना शिक्षणप्रेमी ग्रामस्थ बाबाराजे वारे यांच्या सौजन्याने प्राप्त झालेले ‘स्टडी टेबल’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यानंतर मुली व महिलांची चार गटांतून संगीत खुर्ची स्पर्धा संपन्न झाली.यात कु.प्रतिष्ठा वारे ,कु.मयुरी वारे,सौ.अर्चना वारे व सौ.चंपाबाई वारे यांनी प्रथम क्रमांक तर कु.हर्षदा चव्हाण,कु.ज्ञानेश्वरी वारे,सौ.कोमल वारे व सौ.ताई पौडमल यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.संगीत खुर्ची स्पर्धांतील सर्व विजेत्यांना बांधखडकचे सरपंच राजेंद्र कुटे यांच्या सौजन्याने प्राप्त झालेल्या स्कूल बॅग,प्रवासी बॅग,पाण्याची पिंप, आरामखुर्ची, टिफीन,पर्स,डोसा तवा आणि ब्लॅंकेट इ.भेटवस्तू प्रदान करून गौरविण्यात आले.
यानंतर सर्वांना उत्सुकता लागलेल्या लकी ड्रॉची सोडत संपन्न झाली.चिमुकल्यांच्या हाताने चिठ्ठी उचलून भाग्यवान विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.यात विशेष योगायोग असा की शिक्षणोत्सवातील अन्नदात्या सौ.चंपाबाई कल्याण वारे, बांधखडक या ‘पैठणी’च्या भाग्यवान विजेत्या ठरल्या,तर सौ.कविता पावणे कर्जत (टेबल फॅन),सौ.छाया हुंबे भूम (थर्मास),सौ.मंगल राळेभात जामखेड (पितळी सो-या),श्रीम. वैशाली घोडके बांधखडक (कुकर) आणि सौ.वंदना डोके पुणे (इडली पात्र)या महिला भाग्यवान विजेत्या ठरल्या.
लकी ड्रॉ बक्षीसाच्या भेटवस्तू नायगाव येथील दानशूर शिक्षणप्रेमी सुधीर उगले आणि बांधखडक, वनवेवस्ती व चव्हाणवस्ती शाळांतील सर्व शिक्षक बांधव यांच्या सौजन्याने प्राप्त झाल्या. शिक्षणोत्सवातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेला उपक्रम म्हणजे ‘मातृपितृपूजन’.प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईवडिलांचे पूजन करून त्यांना कृतज्ञता म्हणून स्वनिर्मित असे आकर्षक ‘भेटकार्ड’ दिले व भेटकार्डावरील मजकुराचे सर्वांसमोर प्रकट वाचन केले.मूल्यशिक्षण व पर्यावरण रक्षणाची यावेळी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.
सायंकाळी ७:००वाजता कु.संस्कृती हरिदास पौडमल या इ.५वीच्या विद्यार्थीनीच्या हस्ते फित कापून नायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख केशव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात गॅदरिंगचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी गोळाफेक या वैयक्तिक क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावलेल्या ल.ना.होशिंग विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रल्हाद साळुंके यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भव्य स्टेज, उत्कृष्ट ध्वनी व प्रकाशयोजना, विद्यार्थ्यांनी केलेला लाजवाब नृत्याविष्कार, प्रत्येक पात्राला साजेशी वेशभूषा, पंचक्रोशीतील कलारसिक व शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी केलेला बक्षिसांचा वर्षाव यांमुळे वार्षिक स्नेहसंमेलन सर्वार्थाने संस्मरणीय ठरले.विशेषत: रामकथा, मल्हारगीत,पोताडान्स व डी.जे.साॅंग या नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तवाडी (धोंडपारगाव)शाळेची माजी विद्यार्थिनी कु.अमृता बळीराम शिंदे आणि बांधखडक शाळेची माजी विद्यार्थिनी कु.भक्ती विजय वारे यांनी अतिशय बहारदारपणे केले.आदर्श शिक्षक मुकुंदराज सातपुते, केशवराज कोल्हे व विकास सौने या शिक्षक त्रैमूर्तींनी बक्षीस रकमेची वैशिष्ट्यपूर्ण व अफलातून शैलीत उद्घोषणा करून लोकसहभाग वाढविण्यास मोलाची कामगिरी बजावली.
शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, माता पालक व माजी विद्यार्थी संघ , बांधखडकचे सर्व दानशूर ग्रामस्थ तसेच तालुक्यातील अनेक शिक्षक बांधव यांच्या सक्रीय सहभागातून अन्नदान, बक्षीस भेटवस्तू दान तथा रोख रक्कम स्वरूपात ‘लाख’ मोलाचे भरीव योगदान लाभले. डशिक्षणोत्सवाच्या यशस्वितेसाठी मनोहर इनामदार, नितीन घालमे (बांधखडक) , संदीप शेलार,सीमा सोनवणे (वनवेवस्ती)व नितीन जाधव, विकास सौने (चव्हाणवस्ती) या तीनही शाळांतील शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.