राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रवींद्र भापकर यांचा नॅशनल ज्युरी मेंबर म्हणून सन्मान…!!
जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा, महाराष्ट्रातून भापकर एकमेव
एन.सी. ई.आर. टी नवी दिल्ली व ग्लोबल सायबर पीस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर पीस समिट 2.0 (2026) अनुशंगाणे राष्ट्रीय पातळीवर देशातील विद्यार्थी व शिक्षक यांचेसाठी सायबर सेफ्टी अवेरनेस विषयावर राबविण्यात आलेल्या नॅशनल ई – रक्षा स्पर्धेसाठी यावर्षी जामखेड तालुक्यातील जि. प.प्राथ.शाळा महात्मा फुले नगर (शिऊर) येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक श्री रविंद्र भापकर यांची नॅशनल ज्युरी म्हणून निवड झाली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून भापकर हे एकमेव ज्युरी होते. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याची सवय लावणे आणि नवोपक्रमशील विचारांना प्रोत्साहन देणे हा होता.
देशभरातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विषयांवर आधारित सर्जनशील व्हिडिओ व पोस्टर्स सादर केले होते. श्री भापकर यांनी या स्पर्धेचे निकषानुसार बारकाईने परीक्षण करून गुणांकन यादी एन.सी. ई.आर. टी. व सायबर पीस फाऊंडेशन यांच्याकडे सादर केली होती.
नुकतेच 10 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे पार पडलेल्या ग्लोबल सायबर पीस समिट 2026 या शानदार कार्यक्रमात विजेत्यांसह ज्युरींचा देखील सन्मान करण्यात आला. काही खासगी अडचणीमुळे भापकर हे या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे नुकतेच त्यांच्या सन्मानार्थ सायबर पीस व एन.सी.आर. टी. च्या वतीने त्यांचे सन्मानपत्र तसेच केलेल्या विशेष कामाची आठवण म्हणून सायबर पीस समिट 2026 चा लोगो असलेली लॅपटॉप बॅग, टी शर्ट, उच्च प्रतीची थर्मास वॉटर बॉटल, नोट पॅड,तसेच इ – रक्षा स्पर्धा माहितीपत्रक असे सर्व साहित्य त्यांना कुरिअर ने राहत्या पत्त्यावर प्राप्त झाले.
श्री भापकर हे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक असून ते एन.सी. ई.आर. टी.नवी दिल्ली चे रिसोर्स पर्सन म्हणून कार्यरत आहेत. एन.सी. ई.आर. टी. च्या राष्ट्रीय पातळीवरील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग असतो.
तसेच ते शालेय शिक्षण विभाग,महाराष्ट्र शासनाच्या थिंक टँक चे सदस्य , बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इतिहास विषय समितीचे सदस्य, पी. एम. विद्या डी. टी.एच. चॅनल चे तांत्रिक समन्वयक तसेच अहिल्यानगर जि.प.च्या शिक्षण विभागाचे आय.टी.समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा यापूर्वीच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस , सरसंघचालक श्री मोहन भागवत, केंद्रीय शिक्षणमंत्री श्री रमेश पोखरियाल यांनी प्रत्यक्ष सन्मान केलेला आहे.
आपण केलेल्या कामाचा राष्ट्रीय पातळीवरून असा गौरव झाल्याने श्री भापकर भारावून गेले. विद्यार्थी व शिक्षकांप्रती करत असलेल्या सातत्यपूर्ण कार्याचा हा गौरव आहे असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या या सन्मानाबद्दल जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील. गट शिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, विस्तार अधिकारी अशोक आंधळे, केंद्रप्रमुख केशव गायकवाड , शिऊरचे सरपंच गौतम उतेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ कडू, नारायण निकम, नरेंद्र पाचारे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.