जामखेडच्या महामार्गावर अपघातांचे सापळे! चार वर्षांपासून रस्ता अपूर्ण, पाच महिन्यांपासून पथदिवे बंद, मात्र प्रत्येक पोलवर बॅनरचा झगमगाट! वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग, धुळीचे साम्राज्य अन् रस्त्यावरील खटक्यांमुळे नागरिक त्रस्त, प्रशासनाला आणखी किती अपघातांची प्रतीक्षा?
जामखेडच्या महामार्गावर अपघातांचे सापळे! चार वर्षांपासून रस्ता अपूर्ण, पाच महिन्यांपासून पथदिवे बंद, मात्र प्रत्येक पोलवर बॅनरचा झगमगाट!
वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग, धुळीचे साम्राज्य अन् रस्त्यावरील खटक्यांमुळे नागरिक त्रस्त, प्रशासनाला आणखी किती अपघातांची प्रतीक्षा?
जामखेड शहरातील महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो, तर अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
महामार्गाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या पथदिव्यांच्या पोलवरील दिवे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, पोलवर दिवे नसले तरी जाहिरातींचे आणि कार्यक्रमांचे बॅनर मात्र प्रत्येक पोलवर झळकत आहेत. त्यामुळे हे पोल नेमके पथदिव्यांसाठी उभारले आहेत की बॅनर लावण्यासाठी, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रस्ता ओलांडताना या बॅनरमुळे समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्यावरील खटके बनले अपघातांचे कारण! महामार्गावरील अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्ता आणि कच्चा रस्ता यांच्यामध्ये मोठे खटके निर्माण झाले आहेत. तसेच डिव्हायडरसाठी राखून ठेवलेल्या जागेवरही मोठमोठे खटके आणि अडथळे असल्याने दुचाकीस्वारांची वाहने घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्यामुळे हे अडथळे वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नाहीत. परिणामी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
धुळीच्या साम्राज्यामुळे आरोग्य धोक्यात! अपूर्ण महामार्गाचे काम आणि रस्त्यावरील धुळीमुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांची सततची ये-जा, रस्त्यावरील माती आणि धूळ यामुळे व्यापारी, दुकानदार, पादचारी तसेच स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे श्वसनाचे त्रास आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासन जागे होणार तरी कधी? चार वर्षांपासून महामार्गाचे काम अपूर्ण, पाच महिन्यांपासून पथदिवे बंद, रस्त्याच्या कडेला बेशिस्त पार्किंग, जागोजागी खटके, धुळीचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी जामखेडकर त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न गंभीर बनला असताना संबंधित महामार्ग यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. महामार्गावरील सर्व पथदिवे तातडीने सुरू करावेत, पोलवरील अनधिकृत बॅनर हटवावेत, रस्त्यावरील खटके आणि अडथळे दूर करावेत, बेशिस्त पार्किंगवर कारवाई करावी, धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात आणि महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलवर बॅनर झळकतात, पण दिवे मात्र अंधारात! रस्त्यावर खटके, वाहनांची कोंडी आणि नागरिकांच्या जीविताला धोका… आता तरी प्रशासन जागे होणार का? हाच प्रश्न जामखेडकरांना पडला आहे.