जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर जामखेड एसटी आगारात हेल्पर म्हणून कार्यरत असलेल्या काशिबा तांबे यांचा मुलगा निखिल तांबे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. याबद्दल त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अवघ्या २३ व्या वर्षी निखिलने देशात ५१७ वा रँक मिळवत ‘आयपीएस’ पदाला गवसणी घालत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
यूपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत देशभरातून ९५८ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यात महाराष्ट्रातील ६० उमेदवारांचा समावेश आहे.
यामध्ये जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील निखील तांबे याचा समावेश आहे. निखील याने यूपीएससीत घवघवीत यश संपादन करत यशाचा झेंडा रोवला. तो आता आयपीएस बनणार आहे.
अरणगाव येथील रहिवासी असलेल्या निखिल तांबे याचे प्राथमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे आपल्या मावशीकडे झाले. त्यानंतर त्याने पुणे येथून आपले बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. निखिलचे वडील काशिबा तांबे हे जामखेड आगारात हेल्पर म्हणून काम करतात.
घरची परिस्थिती बेताची आणि वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून निखिलने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि याचे फळ त्याला मिळाले. त्याने देशात ५१७ वा रँक मिळवत ‘आयपीएस’ पदाला गवसणी घातली आहे.
त्याच्या या यशामुळे अरणगावसह संपूर्ण जामखेड तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, एका सामान्य कामगाराचा मुलगा आता देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणार असल्याने तांबे कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.