आमदार रोहित दादा पवारांच्या उपस्थितीत रंगला राज्यस्तरीय सृजन भजन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा…

0
220
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
महाराष्ट्रात पाहिल्यांदाच राज्यस्तरीय सृजन भजन स्पर्धेसारखा उपक्रम राबविण्यात आला असून यंदा त्याचं तिसरं पर्व देखील तेवढ्याच जल्लोषात रंगलं. राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यातून, १९७ तालुक्यांतून १२२० संघ तसेच १४५१२ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला असून १५ ऑगस्ट २०२१ रोजी या स्पर्धेची बारामती येथे सांगता झाली. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पाडला गेला. भजन-कीर्तन सारख्या कला आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतीचा भाग आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीला आपली संस्कृती जपताना अध्यात्माची आवड जोपासता यावी तसेच या कोविड संकटकाळात विठ्ठल भक्तीची सर्वांना अनुभूती घेता यावी म्हणून आमदार रोहित पवार यांचा हा प्रामाणिक प्रयत्न.
दरवर्षी प्रमाणे यंदा ही कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच श्री माऊली सावंत, श्रीधार भोसले आणि रामेश्वर डांगे सारख्या दिग्गज परीक्षकांनी काढलेल्या निकालानुसार कर्जत-जामखेड विभागीय आणि महाराष्ट्र राज्यस्तरीय अशा दोन वेगवेगळ्या गटात जिंकलेले पुढील स्पर्धक:
सृजन भजन स्पर्धा- कर्जत-जामखेड विभाग
प्रथम क्रमांक- हरिभाऊ काळे
द्वितीय क्रमांक- पांडुरंग डाडर
तृतीय क्रमांक- शिवाजी पांढरे
सृजन भजन स्पर्धा- महाराष्ट्र राज्यस्तरीय
प्रथम क्रमांक- गोपाळ सालोडकर, अमरावती
द्वितीय क्रमांक- विद्याधर तांबे, मुंबई
तृतीय क्रमांक- रुपेश देशमुख, कोकण
वरील स्पर्धकांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आलं. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वारकरी संप्रदायमधील मान्यवरांचा देखील श्री राजेंद्र पवार, सौ. सुनंदा ताई पवार व सौ. कुंती ताई पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सृजन भजन स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील स्पर्धकांसह देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील ३१ संघ सहभागी झाले होते. यामध्ये तामिळनाडूतील २६ संघ, कर्नाटकातील ३ संघ, गुजरात आणि मध्यप्रदेश येथील प्रत्येकी १ संघाने सहभाग घेऊन आपल्या भजन संगीततून संत परंपरेतील भक्तीची अनुभूती दिली.
सृजन भजन स्पर्धेची सांगता होतानाच आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांमधील अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्याच्या बाबत महत्वपूर्ण घोषणा केली. अहमदनगर जिल्ह्यात वसलेला खर्डा किंवा शिवपट्टन किल्ला महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. खर्डा किल्ल्याच्या याच कातळांनी एकेकाळच्या निधड्या छातीच्या रांगड्या मावळ्यांचा पराक्रम पाहिला आहे. तेव्हा या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचं प्रतीक म्हणून आणि उत्तम गुणांनीं संपन्न असलेला, ७४ मीटरचा, जगातील सर्वात मोठा भगव्या रुंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. भारतातील मुख्य धार्मिक ठिकाणी आणि पंढरपूरला हा ध्वज फिरवला जाईल. शेवटी १५ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल. या ध्वजविषयी मत व्यक्त करताना आमदार रोहित पवार म्हणाले की हा भगवा रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे आणि या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here