जामखेडच्या समस्या व गुंडाराज विषयी काय म्हणाले रमेश आजबे नगराध्यक्षा पदासाठी आश्विनी रमेश आजबे मैदानात उतरणार

0
17

जामखेड न्युज—–

जामखेडच्या समस्या व गुंडाराज विषयी काय म्हणाले रमेश आजबे

नगराध्यक्षा पदासाठी आश्विनी रमेश आजबे मैदानात उतरणार

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी त्यांच्या सौभाग्यवती आश्विनीताई रमेश आजबे यांना नगराध्यक्षा पदासाठी उमेदवारी दिल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची घोषणा आज दिनांक १४ नोव्हेंबर रोजी जामखेड न्यूजशी बोलताना सांगितले. तसेच जामखेड शहर दहशतमुक्त, स्वच्छ, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी मी सज्ज असल्याचे सांगत आजबे यांनी आपला विकासदृष्टिकोन मांडला.

पुढे बोलताना आजबे म्हणाले,शहरात वाढत चाललेल्या असुरक्षिततेच्या वातावरणाला पूर्णविराम देण्यासाठी रोड रोमिओवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे हटवून त्या जागा पुन्हा नागरिकांसाठी खुल्या केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. व्यापाऱ्यांना संरक्षण व योग्य साथ मिळेल, नोंद लावणीचे शुल्क कमी करून व्यवसायसुलभ वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. भुतवडा रोड बाजारतळातील मटका पूर्णपणे बंद करून त्या जागेचा उपयोग फ्रुट कंपनीसाठी करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. चिकन–मटन विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून त्यांचेही प्रश्न निकाली काढले जातील.

शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून स्वतंत्र आराखडा लागू केला जाईल. त्यासोबतच जामखेड स्वच्छ आणि आधुनिक बनवण्यासाठी राज्यात कुठेही नसलेला अत्याधुनिक कचरा डेपो उभारण्याची घोषणा आजबे यांनी केली. स्वच्छतेसोबत हरित वातावरण निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्याची घोषणाही त्यांनी केली.

मोकाट कुत्रे, डुक्कर आणि जनावरांच्या त्रासाला नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे जनतेने विश्वास ठेवल्यास केवळ तीन महिन्यांत मोकाट जनावरांचा कायमचा बंदोबस्त करणार असल्याचा पक्का शब्द आजबे यांनी दिला. जांबवाडी, भुतवडा, लेहनेवाडी, धोत्री, बटेवाडी, जमादारवाडी व चुंभळी या गावांना अनेक वर्षे कृषी योजना मिळत नसल्याची गंभीर बाब पुढे मांडत, हा अन्याय संपवण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न केले जातील, असे त्यांनी नमूद केले.

शहरात कमी खर्चात आणि बिना मोटर्सने पाणी येत असल्याने नागरिकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी पाणीपट्टी मोफत करण्याचा निर्णयही त्यांनी घोषित केला. आरोग्य व शिक्षणाला प्राधान्य देत नगरपरिषदेमार्फत स्वतंत्र दवाखाना उभारण्याचे, तसेच नगरपरिषद आदेशानुसार नवीन शाळा उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचेही त्यांनी सांगितले. जनतेवर लादलेला जाचक आराखडा रद्द करून नवा जनहिताचा आराखडा लागू करण्यात येईल.

कोरोना काळाची आठवण करताना आजबे म्हणाले की,लोक घरी होते, पण मी लोकांसाठी रस्त्यावर होतो. सेवा हा माझा धर्म आहे.जामखेड शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छ वातावरण, सुरक्षित रस्ते आणि भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार हेच ध्येय असल्याचे सांगत आजबे यांनी जनतेचा आशिर्वाद मागितला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here