जामखेड नगरपरिषद निवडणूकीसाठी सभापती प्रा राम शिंदे विरूद्ध रोहित पवार सामना रंगणार
तिसरी आघाडी व युतीतील घटकपक्ष कोणाची डोकेदुखी वाढवणार
जामखेड – गेल्या सात आठ वर्षांपासून रखडलेल्या जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर निघाला आहे. सोमवारी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. जामखेड नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर यंदा होणारी ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक आहे.या निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार कंबर कसली आहे. प्रभागात जोरदार गाठीभेटी हाती घेतल्या आहेत. गरज पडल्यास काही कामे करुन जनसंपर्क वाढवून जनतेत आपली लोकप्रियता निर्माण करण्यासाठी धडपड सुरु झालेली आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जीवापाड प्रयत्न सुरु आहेत.
जामखेड नगरपरिषदेसाठी १२ प्रभाग असणार असून यातून २४ नगरसेवक निवडले जाणार आहेत, तर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे संघर्ष वाढत चालला आहे. २५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजप विरुध्द राष्ट्रवादी असा थेट सामना रंगताना दिसणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड अरुण जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे तालुकाध्याक्ष महेश निमोणकर हे तिसऱ्या आघाडीची तयारी करत आहेत. त्यामुळे सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार यांची डोके दुखी वाढणार आहे.
खास करुन नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळण्यापासून प्रचंड संघर्ष दिसू लागला आहे. प्रा राम शिंदे यांच्या समोर भा ज पा नेते मधुकर आबा राळेभात, नगरसेवकअमित चिंतामणी, संजय काशिद या पैकी कोण? कोणास उमेदवारी द्यावी हा खरा प्रश्न असणार ; तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटामध्ये संपत राळेभात, विकास राळेभात, शहाजी राळेभात, बिभीषण धनवडे, रमेश आजबे की अन्य कोणी? असा पेच दिसतो आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रा कैलास माने हे पण नगराध्यक्ष पदासाठी निवडणुक लढवतील . ते पुढील दोन दिवसांत त्यांच्या उमेदवारी जाहीर करतील. काँग्रेसचे आय पक्षाचे तालुका अध्यक्ष राहुल उगले हे डॉ अरुण जाधव यांची वंचित बहुजन आघाडी व रासपा व स्वाभिमानी यांनी तिसरी आघाडी केली आहे.
प्रचार यंत्रणेत आकाश बाफना यांनी नगराध्यक्ष पदासाठी आघाडी घेतली आहे. कोणत्याही पक्षाचे तिकीट मिळाले तर ठीक अन्यथा आकाश बाफना हे अपक्ष निवडणुक लढणार आहेत. महायुती अथवा महाविकास आघाडीबाबत कोणतीच घोषणा नसल्याने सर्व पक्षाकडून जवळपास स्वबळावर निवडणुक लढण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे .
विधानसभे नंतर होणारी ही पहिलीच सार्वत्रिक निवडणुक असल्यामुळे या निवडणुकीत विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार या दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने या पदासाठी भाजप व राष्ट्रवादी कोणाला रिंगणात उतरवणार ? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी तीन नावे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडे अनेक उमेदवार आहेत, पणं दोन्ही पक्षाकडूनं मात्र घोषणा नाही
जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी सलग दोन दिवस जामखेड शहरात कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांनी निवडणूक संचलन समितीची बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत निवडणुकीतील रणनीती, संघटनात्मक तयारी, तसेच स्थानिक स्तरावर पक्षाच्या विजयासाठी आवश्यक नियोजनावर सविस्तर चर्चा केली आहे. सोमवार व मंगळवारी या दोन दिवसांत पुन्हा एकदा सभापती हे जामखेड शहरात तळ ठोकून होते . त्यांनी आनेक वार्डातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कार्यक्रम घेतला . प्रत्येक वार्डातील नगरसेवकाने मुलाखतीसाठी मोठी गर्दी करून ढोल ‘ ताशा व फटाक्याच्या अतिषबाजीने शक्तीप्रदर्शन केले . जणू काही जामखेड शहरात दुसरी दिवाळी साजरी होतानाचे चित्र दिसले .
यावेळी सभापती राम शिंदे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत जामखेड नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला. दुसरीकडे भाजपचा प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटानेही कंबर कसली आहे. रोहित पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. प्रा राम शिंदे यांनी उमेदवारांच्या मुलाखती बैठक घेत कार्यकर्त्यांत जोश भरला आहे. त्यांनी या बैठकीतून नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकत आघाडी घेतली आहे. भाजपकडून उमेदवारी देताना प्रा शिंदे हे स्वत: जातीने लक्ष घालत आहेत. मागील निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून यंदाच्या निवडणुकीत तिकीट वाटप करताना अनेक गोष्टींची भाजपकडून खबरदारी घेतली जाणार असल्याचे समजते.
जामखेड नगरपरिषदेत नगराध्यक्ष महिलांसाठी राखीव असल्याने आणि ते थेट जनतेद्वारे निवडले जाणार असल्याने, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. या दोन्ही राजकीय पक्षांनी त्यांच्या मित्रपक्षांना दुर्लक्षित केल्यामुळे, काहींनी स्वतंत्रपणे प्रचार करण्यास सुरुवात केली आहे, भविष्यातील नगराध्यक्ष म्हणून प्रचार करत आहेत.
जागावाटप आघाडीचा पर्यायही समोर आला आहे. मागील नगरपरिषद निवडणुकीत पराभूत झालेले आणि नवीन इच्छुक उमेदवार वाट पहाण्याच्या मन: स्थितीत नाहीत. २०१६ च्या निवडणुकीच्या जागा वाटपाची चुक पुन्हा होऊ नये यासाठी प्रा राम शिंदे जातीने लक्ष घालतांना दिसताहेत. तर विद्यमान आमदार रोहित पवार यांनी हाळगांव कारखाना येथे इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत . नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने या पदासाठी भाजप व राष्ट्रवादी कोणाला रिंगणात उतरवणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे . चौकट
नगराध्यक्षाची थेट जनतेतून निवड होणार असल्याने ‘काँटे की टक्कर’
जामखेड नगरपरिषदेत निवडणुकीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने सर्वच पक्षाचे व अपक्ष उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत त्यामुळे जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक ही काटे की टक्कर होणार असल्याचे पहावयास मिळत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी स्थानिक पातळीवर आघाडी आणि युतीचे गुऱ्हाळ सुरुच असून अजून काही दिवस असेच चर्चेचे गुऱ्हाळ सुरु राहील. शेवटच्या टप्प्यात आघाडी व युतीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता ? जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात अनेकजण इच्छुक असतानाही उमेदवारी मिळणार नसल्याची अनेकांना चाहुली लागली आहे . त्यामुळे ते वेगळा मार्ग निवडल्याशिवाय राहणार नाहीत मात्र यामुळे पार्टीचे उमेदवार अडचणीत येतील असेही बोलले जात असून भाजपाकडे इच्छुक उमेदवार जास्त असल्याने बंडखोरी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता कमी प्रमाणात दिसत आहे .
नगराध्यक्ष पदासाठी मुस्लीम समाजाचे मतदान निर्णायक
जामखेड नगरपरिषदेच्या होत असलेल्या निवडणुकीसाठी मुस्लीम समाजाची भूमिका निर्णायक ठरणार नगरपरिषदचे एकूण मतदार 33 हजार आहेत .त्यात मुस्लीम समाजाचे एकुण 6 ते 6500 हजार मतदान आहे . मुस्लीम समाजाचे ज्याला मतदान होईल तो जामखेड नगरपरिषदेचा नगराध्यक्ष होईल. मुस्लीम समाजाचे निर्णायक मतदान असल्यामुळे सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार हे काय जादुची कांडी फिरवतात की मुस्लीम समाज काय निर्णय घेईल याकडे सर्वच पक्ष व अपक्षांचे लक्ष लागले आहे .
नगरपरिषद निवडणुकीचेआरक्षण नगराध्यक्ष पद. – सर्वसाधर महिला
सर्वसाधरण वर्ग- 14
इतर मागासवर्गीय – ६
अनुसूचित जाती- 3
अनुसूचित जमाती- १
एकूण २४
मागील निवडणुकीत विजयी जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – १० ; शिवसेना ४ ,भाजपा ३, मनसे १, अपक्ष ३ एकुण जागा – २१