पाच जिल्ह्य़ाच्या सीमेवर व रात्रंदिवस एस टी बससेवा देत असलेले जामखेड बसस्थानक चिखलमय झाले आहे. दिपावली व विविध कार्यक्रमामुळे सदर बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी आहे. बस आली की प्रवासी लहान मुले व सामान घेऊन चिखलातून वाट काढत बसमध्ये जातात. यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत मात्र आगारप्रमुखाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे “प्रवाशांच्या सेवेसाठी” असे बिद्र वाक्य आहे. परंतु यास जामखेड बसस्थानक अपवाद आहे. सदर बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम मागील चार वर्षांपासून रडतपडत चालू आहे. दिवाळी सणाला आपल्या माहेरी जाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली आहे.
त्यातच मागील चार पाच दिवसापासून पाऊस पडत आहे. पावसाचे पडणारे पाणी व आजुबाजुच्या परिसरातून येणाऱ्या पाण्यामुळे बसस्थानक परिसरात तळ्याचे स्वरूप आले आहे. तसेच या परिसरात काही ठिकाणी मुरूम टाकला गेला. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे मुरूमाचा चिखल झाला आहे.
या चिखलातून वाट काढत प्रवाशांना बसमध्ये बसावे लागत आहे. पाऊसामुळे बस स्थानकांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरणे ही समस्या आता नवीन राहिली नाही.
जामखेड बस स्थानकांमध्ये पाऊसामुळे खड्डे, दलदल आणि गाळ साचल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवाशांना, विशेषतः वृद्ध आणि महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणुन ओळख असलेल्या जामखेड शहरातील बस स्थानकावर नेहमीच गर्दी असते.
दिवाळी सणात या मध्ये लक्षणीय वाढ होते. अशीच परिस्थिती अजून किती दिवस राहणार? आणि जामखेडचे अत्याधुनिक बस स्थानक कधी पूर्ण होणार? असा प्रश्न नागरिक व्यावसायिक प्रवासी जेष्ठ नागरिक व महिला विचारत आहेत.