सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी ऐन दिवाळीतही अपघातग्रस्तांना वेळीच मदत साकत – जामखेड रस्त्यावरील खड्डयामुळे अपघात

0
1053

जामखेड न्युज—–

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी ऐन दिवाळीतही अपघातग्रस्तांना वेळीच मदत

साकत – जामखेड रस्त्यावरील खड्डयामुळे अपघात

दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. सर्वत्र रोषणाई, फटाके आणि आनंदाचे वातावरण असताना काही लोक मात्र समाजासाठी आपले सुख बाजूला ठेवतात. अशाच एका घटनेने पुन्हा एकदा मानवतेचा खरा दीप उजळवला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता भर पावसात रुग्णवाहिकेतून जात मोटारसायकल अपघातातील जखमींचे प्राण वाचवले आहेत.

सानाजिक कार्यकर्ते संजय कोठारी मंगळवारी (ता.२१) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीपुजनच्या तयारीत होते. दुपारपासून तशी लगबग चालु होती. मात्र त्याचवेळी जामखेड साकत रस्त्यावर मोटारसायकल अपघात झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांना फोनवर मिळाली. प्रत्यक्षात घडलेला अपघात साकतच्या पुढे पाटोदा रस्त्यावर होता. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे मोटरसायकल घसरून झालेल्या या अपघातात रेणुका अक्षय पवार (वय २५) व त्यांचे पती अक्षय सुभाष पवार ( दोघेही राहणार अरणगाव, ता. जामखेड, जिल्हा अहिल्यानगर ) हे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती सुरेंद्र नेमाने यांनी सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांना दिली. यावर कोठारी यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली रुग्णवाहिका घेऊन भर पावसात घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पाऊस कोसळत होता, रस्ता चिखलमय होता, पण कोठारी यांनी समाजसेवेची व्रत जोपासत वेळ न दवडता तातडीने पोहोचून जखमींना सुरक्षितपणे जामखेडला आणून दवाखान्यात दाखल केले.

या अपघातात रेणुका पवार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, तर अक्षय पवार किरकोळ जखमी झाले. दोघांना तातडीने दाखल केल्याने योग्य उपचार मिळाले आणि त्यांचा जीव वाचला. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत असलेला ६ वर्षांचा लहान मुलगा गोपाळ अक्षय पवार हा बालबाल वाचला.

घटनास्थळी सुरेंद्र नेमाने, दीपक भोरे, अमोल वराट, दादासाहेब वराट, कांतीलाल वराट यांनी मदत केली. दरम्यान घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली.

प्रतिक्रिया – १

शेवटी वेळेला मदत करणे गरजेचे होते. या भावनेतुन लक्ष्मीपुजन पुर्वी अपघातग्रस्तांना मदत केली. दिवाळीचा दिवस असो वा पावसाचा, पण जेव्हा कुणाचा जीव धोक्यात असतो, तेव्हा सेवा हीच खरी दिवाळी वाटते. माझ्या रुग्णवाहिकेचा वापर करून एखाद्याचा जीव वाचवता आला, हाच सर्वात मोठा आनंद आहे.

— संजय कोठारी
सामाजिक कार्यकर्ते,जामखेड

प्रतिक्रिया – २

संजय कोठारी यांना सुट्टी म्हणजे माहीतच नाही. दिवाळीचा दिवस असूनही, त्यांनी पंधरा मिनिटांत पंधरा किलोमीटरचा प्रवास करून घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना सुरक्षित रुग्णालयात दाखल केले. त्यांचे हे कार्य आदर्शवत आहे.

— सुरेंद्र नेमाणे
साकत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here