जामखेड न्युज – – –
राज्यातील तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा प्रश्न लवकर सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तासिका तत्वावरील नियुक्तीच्या धोरणाचा आढावा घेऊन नवीन पर्यायी धोरण सरकारला सुचवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सहा सदस्यांची समिती गठीत केली आहे. ही समिती राज्य सरकारला दोन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.
धोरण ठरवण्यासाठी सहा जणांची समिती
पुण्यातील तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी आपल्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले होतं. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे तासिका तत्वावरील प्राध्यापकांचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
40 हजार शिक्षकांची भरती
शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळांतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.
दोन वर्षानंतर परीक्षा
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा तब्बल दोन वर्षांनतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. दोन वर्षानंतर ही परीक्षा होणार आहे. 2018-19 मध्ये शेवटची परीक्षा झाली होती.
परीक्षार्थींची संख्या वाढण्याची शक्यता
कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्यात दरवर्षी सात लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. दोन वर्षाच्या गॅपमुळे दहा लाख विद्यार्थी या वेळी परीक्षेला बसतील असा अंदाज आहे.




