अतिवृष्टीने सावरगाव येथे घर कोसळले एकाच कुटुंबातील तीन जण जखमी, एक जण गंभीर
जामखेड परिसरात गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. विशेषतः नदीकाठच्या लोकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पिके पाण्यात गेलेली आहेत त्यामुळे तालुक्यातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे. यातच सावरगाव येथे पावसामुळे एक घर पडले असून घरात झोपलेले तीन जन जखमी झाले आहेत यातील एक जणांची प्रकृती गंभीर आहे.
जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे गौतम बाबासाहेब गोरे हे रात्री आपल्या घरात कुटुंबासमवेत झोपलेले असताना रात्री साडेचार वाजता घर कोसळले यात स्वत: पत्नी व मुलगा तीघे जखमी झाले आहेत गौतम गौरे यांना जास्त मार लागला आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत.
सावरगाव येथे गौतम बाबासाहेब गोरे (वय ४०), पत्नी सोनाली गौतम गोरे (वय ३५) व मुलगा सार्थक गौतम गोरे १४ हे घरात झोपलेले असताना पहाटे साडेचार च्या सुमारास अचानक झोपेतच अंगावर घर कोसळले यात तीघे जण जखमी झाले यातील गौतम गोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. तिघांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवले आहे.
घर कोसळले तेव्हा मोठा आवाज झाला हे ऐकून ताबडतोब आसपासचे लोक जमा झाले यांनी ताबडतोब जखमींना ढिगाऱ्याबाहेर काढले. व नगरला उपचारासाठी पाठवले घटनेची माहिती पोलीस पाटील तुषार चव्हाण पाटील यांनी तहसीलदार, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक यांना दिली शासकीय यंत्रणेने घटनेचा पंचनामा केला आहे.
शहरातील नागेश्वर मंदिरात जाण्यासाठी धाकटी नदीवर लोखंडी पुल रात्रीच्या पावसामुळे खचला आहे. उदघाटनाच्या आधीच पुल खचल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी लाइटचे पोल पडलेले आहेत. तसेच दशक्रिया विधीसाठी तयार करण्यात आलेले ओठेही खणून गेले आहेत. सुमारे तीन कोटी रुपयांचे काम पहिल्याच पावसात खचले व वाहून गेले आहे. सध्या नदीपात्र लहान होत आहेत. अतिक्रमणे झालेली आहेत यामुळे पाणी नदीपात्र च्या बाहेर येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले काम पहिल्याच पावसात खचते याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
साकत, जातेगाव, दिघोळ मध्ये ढगफुटी झाली. रात्रभर दिघोळमध्ये पावसाने मोठी दाणादाण उडवून दिली आहे. गावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. सावता दगडे यांच्या घराला पाण्याचा वेढा पडला आहे. विधाते वस्ती येथे मंदिराला पाणी लागले आहे.त्याचबरोबर मांजरा नदीला मोठा पुर आल्याने नदी पात्र सोडून वाहत आहे. दिघोळमध्ये पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. रात्रीपासून येथील नागरिकभीतीच्या सावटाखाली जागे आहेत. संपूर्ण गाव जागे आहे.
तालुक्यातील अनेक घरामध्ये पाणी शिरलेले आहे. नदीचे पाणी नदीपात्र सोडून शेतात घुसले आहे. शेती खणून गेले आहे. तर अनेक ठिकाणी लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. एनडीआरएफ ची टीम खर्डा परिसरात आलेली आहे मदत कार्य सुरू आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.