चोंडी विकास प्रकल्पाला वेग : सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे ! सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे चोंडी पर्यटन विकासाला गती

0
567

जामखेड न्युज—–

चोंडी विकास प्रकल्पाला वेग : सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे !

सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे चोंडी पर्यटन विकासाला गती

विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चोंडी येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाच्या जलद विकासासाठी फडणवीस सरकारकडून वेगाने पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने चोंडीच्या सिना नदीवर २ बुडीत बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित असून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सरकारने २१ लाख रूपये मंजुर केले आहेत. या बंधाऱ्यांमुळे सिंचन, पाणीपुरवठा, नदीपात्राचे सौंदर्यवर्धन आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त श्री क्षेत्र चोंडी (ता. जामखेड) येथे ६ मे २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीत विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या ‘श्री क्षेत्र चोंडी बृहत विकास आराखड्यास’ सरकारने मंजुरी दिली होती. या आराखड्यासाठी ६८१ कोटी ३२ लाख रूपये खर्चाच्या मान्यता देत शासन निर्णय जारी करण्यात आला होता.

त्यानंतर पावसाळी अधिवेशनात चोंडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी सरकारने ३६० कोटींचा निधी मंजुर केला होता आता चोंडी येथील सिना नदीवर २ बुडीत बांधण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. जलसंपदा विभागाने सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्वेक्षणासाठी रु. २१.१३ लाख खर्च मंजूर करण्यात आला आहे, हे काम महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. या कामामुळे नदीपात्राचे सौंदर्यवर्धन होणार आहे. तसेच नदीत पाणीसाठा वाढून परिसराला दीर्घकालीन सिंचन व पाणीपुरवठ्याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

श्री क्षेत्र चौंडी बृहद विकास आराखड्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळाचे सुशोभीकरण, नदीत भव्य पुतळा, चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोध्दार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने व खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ, चौंडी परिसरातील ऐतिहासिक, पौराणिक स्मृतीस्थळांचे जतन, पायाभूत सुविधा उभारणी, सिना नदी सुशोभीकरण व शुद्धीकरण, तसेच दोन बुडीत बंधारे बांधणीचा समावेश आहे.

विकास आराखड्याचा एकुण निधी तपशील

चौंडी येथील स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन – रु. ६८१ कोटी ३२ लाख
चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे – रु. ३६० कोटी
सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे – रु. ५० कोटी
एकूण – रु. १०९१ कोटी ३२ लाख (आज अखेर मंजुर निधी)

चौकट

“”पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहचावे, जगाला प्रेरणा मिळावी, यासाठी चोंडीत राष्ट्रीय स्मारक उभारत आहोत. या प्रकल्पासाठी महायुती सरकारने १०९१ कोटी ३२ लाख रूपयांचा निधी उपलब्ध केला आहे. सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे या प्रकल्पाच्या विकासासाठी महत्वाचे पाऊल आहे. चोंडी विकास प्रकल्पासाठी भरघोस निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, व महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार.”

 

— प्रा. राम शिंदे, सभापती, विधानपरिषद

चौकट

“सिना नदीवरील हे दोन बुडीत बंधारे केवळ सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठीच उपयुक्त ठरणार नाहीत, तर चोंडीच्या पर्यटन विकासालाही मोठी चालना देतील. नदीपात्रातील पाणीसाठा व सौंदर्य वाढल्याने येथे बोटिंग, लेझर शो, लाईटिंगसह विविध सुविधा उभारल्या जातील. पर्यटकांसाठी आकर्षणकेंद्र निर्माण होऊन स्थानिक रोजगार वाढेल. चोंडीला येणाऱ्या भाविक-पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येईल. या बंधाऱ्यांमुळे चोंडी हे धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here