डॉ.संजय भोरे यांचे वैद्यकीय,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान – प्रा.राम शिंदे अहिल्यानगर येथे “गौरव महाराष्ट्राचा” पुरस्काराने सन्मानित डॉ. भोरे सन्मानित
डॉ.संजय भोरे यांचे वैद्यकीय,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान – प्रा.राम शिंदे
अहिल्यानगर येथे “गौरव महाराष्ट्राचा” पुरस्काराने सन्मानित डॉ. भोरे सन्मानित
डॉ. संजय भोरे यांचे वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक योगदान उल्लेखनीय आहे. प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी उभा केलेला प्रवास प्रेरणादायी आहे. ‘प्रयत्न हॉस्पिटल’मधून गोरगरीबांना माफक दरात सेवा तसेच ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था स्थापन करून शिक्षणाची दारे उघडली.
या कार्याची दखल घेत‘गौरव महाराष्ट्राचा’ हा सन्मान त्यांच्या कार्याचा योग्य गौरव आहे.त्यांचे कार्य असेच जोमाने पुढे चालू राहावे अशी अपेक्षा सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील डॉ. संजय मुरलीधर भोरे यांना एन टी व्ही न्यूज मराठीच्या “गौरव महाराष्ट्राचा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एन टी व्ही न्यूज मराठीच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त १२ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथील व्ही स्टार हॉटेलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष राजा माने ,पद्मश्री पोपटराव पवार,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ंया वेळी त्यांच्यासोबत आई कांताबाई मुरलीधर भोरे, पत्नी सौ.अस्मिता संजय भोरे, मुले यशराज संजय भोरे व प्रा.तेजस संजय भोरे,उपस्थित होते.
डॉ. भोरे हे एका शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून जामखेड येथे ‘प्रयत्न हॉस्पिटल’ स्थापन केले. त्यांनी माफक दरात गोरगरीब रुग्णांची सेवा केली आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी ग्रामीण भागात साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, स्व. एम.ई. भोरे ज्युनिअर कॉलेज, सनराईज इंग्लिश स्कूल, देवदैठण येथील संभाजीराजे ज्युनिअर कॉलेज, कुसडगाव येथील काळोबा माध्यमिक विद्यालय आदी शैक्षणिक संस्था स्थापन करून अनेक मुलामुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. सामाजिक कार्य, मोफत आरोग्य शिबिरे आणि पारदर्शक सेवेमुळे त्यांचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद ठरले आहे.
मनोगत व्यक्त करताना डॉ. भोरे म्हणाले की,या पुरस्काराने मिळालेला मान हा माझ्यासाठी सन्मानाबरोबरच जबाबदारीही वाढवणारा आहे. समाजातील प्रत्येक गरजू रुग्ण, शिक्षणापासून वंचित मुलं-मुली आणि सर्वसामान्य नागरिकांची सेवा पारदर्शकतेने व प्रामाणिकपणे करण्याचा माझा ध्यास कायम राहील. हा सन्मान माझ्या कुटुंबाचा, माझ्या सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आहे. यामुळेच मी आणखी जोमाने कार्य करणार आहे.