शिऊर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनाच्या निकृष्ट कामाची चौकशी करून काम इस्टीमेट नुसार करावे म्हणून शिऊर ग्रामस्थांचे उपोषण
जामखेड तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून त्या कामाची चौकशी करून काम शासकीय इस्टीमेट नुसार करावे या मागणीसाठी आज तहसील कार्यालयासमोर शिऊर ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे.
तसे निवेदन शिवसेना तालुका उपप्रमुख दलीत आघाडी पांडुरंग समुद्र यांनी दिले होते. सरकारच्या विरोधात सरकारच्या घटक पक्षातीलच पक्षाच्या पदाधिकाऱ्याला उपोषण करावे लागत आहे. यामुळे सरकारला घरचा आहेत असे बोलले जात आहे.
मौजे शिऊर ता.जामखेड जि. अहिल्यानगर येथे सामाजिक भवनाचे जे काम चालू आहे ते निकृष्ट होत असल्याबाबत दि. २ जून रोजी लेखी पत्राव्दारे कळवले होते तरी संबधीत विभागाने कसलीच दाखल घेतली नाही. यामुळे आज शिऊर ग्रामस्थांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
उपोषणाला शिऊर येथील ग्रामस्थ व महिला बसलेल्या आहेत. पांडुरंग भगवान समुद्र, कचरू पुलवळे, बाबासाहेब समुद्र, विश्वास समुद्र, राहुल समुद्र, शिल्पा समुद्र, हिराबाई पुलवळे, मिरा समुद्र, सुनील समुद्र यांच्या सह अनेक ग्रामस्थ व महिला उपोषण स्थळी आहेत.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षापुर्वी दलितवस्तीमध्ये बौध्द विहारचे काम झाले त्याची आज सदर कामाची दुरावस्था झालेली आहे. स्थानिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांचे हितसंबंध असल्याने काम हे इस्टीमेट प्रमाणे होणार नाही.
तसेच सदर कामामध्ये अनिश्चतता होऊ शकते तसेच आज रोजी सद्यस्थितीमध्ये जेवढे काम झालेले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने संबधीत काम याची पाहणी करणे करीता तांत्रिक अधिकारी यांनी समक्ष भेट देऊन कामाच्या दर्जाबाबत आपल्या स्ततरावरुन चौकशी करण्यात यावी.
तसेच सदर काम हे कर्जत जामखेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून न करता इतर शेजारील तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात यावे व सदर बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना दिले होते. यानुसार आज उपोषण सुरु झाले आहे.