जामखेड तालुक्यातील वृध्द दांपत्यास मारहाण करत चोरी, तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
तालुक्यातील राजेवाडी येथील वयोवृद्ध जोडप्यास अज्ञात चोरट्यांनी चाकूने वार करत मारहाण करून जखमी केले व त्यांच्या कडील गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला तीन अज्ञात चोरट्यांविरोधात मारहाण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ७ आँगस्ट रोजी जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील खरात वाडी शिवारातील शेतात फिर्यादी सेवक कोंडीबा गोरे व त्यांची पत्नी तोळाबाई सेवक गोरे हे रात्रीच्या सुमारास शेतातील घरासमोरील पडवीत झोपले असताना रात्री अकराच्या सुमारास अंदाजे 22 ते 25 वयोगटातील तीन अज्ञात चोरटे घराजवळील पडवीत आले व या दांम्पत्याकडे घराची चावी मागितली यावेळी फिर्यादी चावी शोधत असताना त्यांच्या तोंडावर चाकू मारून जखमी केले.
गळ्यातील बदाम तोडून घेतला तसेच पत्नीला देखील चोरट्यांनी तोंडावर, हातावर, पाठीवर दगडाने मारहाण करत जखमी केले व गळ्यातील डोरले व कानातील झुबे चोरट्यांनी काढून घेतले व पळून जाताना पुन्हा फिर्यादी च्या हातावर चाकूने वार केला.
या घटनेत चोरट्यांनी कानातील व गळ्यातील एकुण 18 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. जखमी दांपत्यावर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली. दि. 8 रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी घटनास्थळी श्वान पथक, फाँरेन्सीक लँब व फिंगर प्रिंट पथकास पाचारण करण्यात आले होते.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे करत आहेत.