आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप
जामखेडच्या तहसीलदारांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली असून या बदलीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मात्र राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची गटरचना करताना विशिष्ट गटात सोयीच्या विशिष्ट गावांचा समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आदेश न जुमानल्याने तहसीलदारांची गडचिरोलीला बदली करण्यात आल्याचा घणाघाती आरोप आमदार रोहित यांनी केला आहे.
जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांच्या बदलीचा मंगळवारी आदेश निघाला असून त्यांची धानोरा (जि. गडचिरोली) येथे बदली करण्यात आली आहे. अवघ्या एका वर्षात या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने जामखेडच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हा परिषदेच्या गटरचनेचे काम सुरु आहे. जामखेड तालुक्यात साकत, खर्डा आणि जवळा असे तीन गट असून यातील काही गटातील गावे ही दुसऱ्या गटात समाविष्ट करण्याचा आदेश ‘वरून’ देण्यात आला होता.
परंतु सत्ताधारी असो की विरोधक त्यांच्या राजकीय आदेशापेक्षा नियमाला महत्त्व देणारे तहसीलदार गणेश माळी यांनी या आदेशाचे पालन केले नाही. यावरून वजनदार सत्ताधारी नेत्याने संबंधित अधिकाऱ्याच्या अंगावर फाईलच भिरकावल्याची जोरदार चर्चा आहे. वॉर्ड रचना असो, गट रचना असो किंवा गण रचना ही सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच आपल्या सोयीची केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे आणि संबंधित तहसीलदारांची बदली थेट गडचिरोलीला करण्यात आल्याचे दिसत आहे.
दरम्यान, या बदलीकांडात आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली असून सोयीच्या गटरचनेला नकार दिल्यामुळे शिक्षा म्हणून तहसीलदारांची बदली गडचिरोलीला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा त्यांनी थेट नामोल्लेख केला नसला तरी त्यांचा स्पष्ट अंगुलीनिर्देश हा प्रा. राम शिंदे यांच्याकडे आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियात केलेल्या ट्विटमध्ये सत्तेचा कसा गैरवापर केला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जामखेडच्या तहसीलदारांची झालेली बदली असा उल्लेख केला आहे. ‘‘जिल्हा परिषद निवडणुकीची गटरचना करताना ती राजकीयदृष्ट्या आपल्या सोयीची व्हावी यासाठी काही गावांचा विशिष्ट गटात समावेश करण्याचा हट्ट तहसीलदारांनी मान्य केला नाही.
त्यामुळं अहंकाराला धक्का लागलेल्या नेत्याने पदाचा गैरवापर करत राजकीय दबावाला बळी न पडता नियमाप्रमाणे काम करणाऱ्या तहसीलदारांना थेट गडचिरोलीचा रस्ता दाखवला. तहसीलदारांच्या बदलीमुळं काहींना क्षणिक असा विकृत आनंद मिळेल पण त्याचा प्रशासनावर विपरित परिणाम होतो त्याचं काय? अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाचं असं बक्षीस मिळत असेल तर त्यांनी केवळ सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं म्हणून काम करायचं का? आता नवीन तहसीलदारांकडून जिल्हा परिषदेच्या गटरचनेत अहंकारी नेत्याला अपेक्षित बदल होतात की नाही, याकडं आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.’’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोट हाती सत्ता असल्याने काही नेत्यांना अहंकाराची बाधा झाली आहे. मग नियमात नसलेल्या कामासाठीही अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असून नियमबाह्य आदेशाचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याची दुर्गम भागात बदली केली जाते. वास्तविक प्रामाणिक अधिकारी असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाची शिक्षा मिळत असेल तर त्यांच्याकडून चांगल्या कामाची कशी अपेक्षा करता येईल? त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर यावं अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही.’’ रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)