सध्या जामखेड शहरात बंदूकीची धमकी देण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. तुला जर फळविक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला पाचशे रुपये रोज दे, नाहीतर गोळ्या घालू आशी धमकी शहरातील एका फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यास दिली. या प्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गून्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळाले माहिती अशी की दि ११ जूलै रोजी रात्री ८.३० वा जामखेड शहरातील संविधान चौक लक्ष्मीआई मंदिरांचे समोर समीर महंमद बागवान हा नेहमी प्रमाणे फळविक्री करत होता.
यावेळी त्या ठिकाणी आरोपी सोनु वाघमारे रा. आरोळेवस्ती जामखेड, ता. जामखेड जि. अहील्यानगर, आदम जलाल शेख रा. फक्राबाद ता. जामखेड जि. अहिल्यानगर हे आले व तुला जर फळविक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला पाचशे रुपये रोज दयावे लागतील असे म्हणून फिर्यादीस चापटाने गालात मारहाण केली.
विक्रीसाठी आणलेले सफरचंदाचे नुकसान करुन तु जर आम्हाला न विचाराता फळाचे दुकान लावले तर आमचेकडील बंदुकीने तुला गोळ्या घालू अशी धमकी दिली आहे.
या प्रकरणी फिर्यादी समीर बागवान यांच्या फिर्यादीवरुन सोनु वाघमारे व आदम जलाल शेख या दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोसई गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोस ई गावडे हे करत आहेत.
सध्या जामखेड शहरासह तालुक्यात गुन्हेगारी मध्ये बंदूकीचा वापर तसेच धमकावणे, गुंडगिरी, दहशत पसरवणे, खाजगी सावकारकी, खंडणी मागणे असे प्रकार वारंवार वाढतच चालले आहेत. पोलीस प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन संबंधित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे असे नागरिकांमधून मागणी होत आहे.