अंशतः विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन, आ. रोहित पवार रात्रभर शिक्षकांबरोबर, आज शरद पवार आंदोलन स्थळी येणार

0
514

जामखेड न्युज—–

अंशतः विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन, आ. रोहित पवार रात्रभर शिक्षकांबरोबर, आज शरद पवार आंदोलन स्थळी येणार

राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या खासगी शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय या सरकारने घेतला, परंतु त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. तसंच शाळांच्या संचमान्यतेचा विषयही प्रलंबित असून याबाबत ‘शिक्षक समन्वय संघा’च्यावतीने मुंबईत आझाद मैदानावर राज्यभरातील शिक्षकांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला भेट देऊन त्यांना पाठींबा दिला आणि आंदोलनात सहभागी झालो. यावेळी हजारो शिक्षक आणि शिक्षक आमदार आंदोलन करत असूनही हे सरकार त्याकडं डोळेझाक करत आहे, पण या शिक्षकांसोबत आम्ही सरकारला ‘धडा’ शिकवल्याशिवाय राहणार नाही. असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. मंगळवारी शिक्षक त्यांच्या मागण्यासाठी अधिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला पोलिसांनी आंदोलन स्थळाचा माईक आणि लाईट बंद केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार हे शिक्षकांसह रात्रभर आंदोलन स्थळी उपस्थित होते तर आज शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत.

आपल्या विविध मागण्यासाठी 5 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून समर्थन दिलं जात आहे. यावर जर तोडगा निघाला नाही तर शरद पवार हे आज बुधवारी आंदोलकांची भेट घेणार आहेत.

रोहित पवार रात्रभर उपस्थित

दरम्यान, शिक्षकांच्या या आंदोलनाला रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. शिक्षकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “मी शिक्षकांचा, युवकांचा, शेतकऱ्यांचा विषय घेऊन पुण्यापासून नागपूरपर्यंत चाललो. तरी सुद्धा सरकार जागं होत नाही. आता जोपर्यंत एखादा मंत्री इथं येत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत असणार. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उठायचं नाही. तुमच्या मागे आम्ही सर्वजण आहोत.”

नेमकं काय आहे प्रकरण?
राज्यातील सुमारे 5,000 खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर 10 महिने उलटूनही अद्याप निधीची कोणतीही तरतूद सरकारने केली नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर 8 व 9 जुलै रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यामध्ये सध्या 5,844 अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये 820 प्राथमिक, 1,984 माध्यमिक व 3,040 उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 3,513 प्राथमिक, 2,380 माध्यमिक व 3,043 उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण 8,602 प्राथमिक शिक्षक, 24,028 माध्यमिक शिक्षक आणि 16,932 उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here