म्हशी घ्यायला 7 लाख साठवले होते, सहावीत शिकणाऱ्या मुलाच्या ‘फ्री फायर गेम’मुळे बापाच्या बँक खात्यातील पाच लाख उडाले, कोल्हापुरातील या सायबर ‘डल्ल्या मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात डिजिटल अरेस्टमुळे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण ताजे आहे. राजारामपुरीत साडेतीन कोटीची आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यात डिजिटल अरेस्टमुळे आठ कोटीची फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल आहेत.
असं असताना आता ऑनलाइन गेममुळे एका शेतकऱ्याला पाच लाख रुपयांचा फटका बसला आहे. म्हशी घेण्यासाठी सात लाख रुपये साठवले होते. पण मुलाने ऑनलाईन गेमच्या नादात पाच लाख रुपये गमावल्याची घटना राधानगरी तालुक्यात घडली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हशी घेण्यासाठी 7 लाख रुपये बँक खात्यात साठवले होते. पण सहावीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलाने मोबाइलवर ‘फ्री फायर’ गेम खेळताना नकळत काही अॅप घेतले. त्यानंतर काही क्षणात बँक खात्यातील पाच लाखांची रक्कम गायब झाली.
बँक खात्यातून पाच लाख उडवले संबंधित शेतकऱ्याने म्हशींचा गोठा करून चांगला जम बसवला होता. नवरा-बायको दोघे काबाडकष्ट करून गोठा आणखी वाढविण्याच्या विचारात होते. यासाठी ते बँक खात्यात पैसे साठवत होते. मे महिन्यात ते हरयाणातून चार म्हशी आणणार होते. यासाठी बँकेत जाऊन खात्यात साठवलेल्या पैशांची माहिती घेताच त्यांना धक्का बसला.
खात्यावर फक्त दोन लाख रुपये शिल्लक होते. स्टेटमेंट काढल्यावर खात्यातून ऑनलाइन पैसे गेल्याचे लक्षात आले. बँकेने हात झटकून पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्याने सायबर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी शेतकऱ्याच्या मोबाइलपासून तपासाला सुरुवात केली.
ऑनलाईन गेममध्ये आर्थिक जोखीम हायटेक जमान्यामध्ये गेमिंगची एक वेगळीच इंडस्ट्री तयार झाली आहे. यामध्ये लहान मुलांपासून तरुणाई देखील जाळ्यात सापडली आहे. हे गेम केवळ ऑफलाइन पद्धतीने खेळले जात नाहीत तर ऑनलाईन पैशाचे व्यवहार देखील यावरून होतात.
या ॲप्स कडून आर्थिक जोखीम असल्याचा संदेश दिला जातो. मात्र त्याकडे सर्रासपणे कानाडोळा केला जातो. याला पालक देखील तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कुणाची तरी कष्टाची शिदोरी लुटली जाऊ नये एवढीच अपेक्षा.