बुलेट ट्रेन सुस्साट; मुंबई-नागपूर साडेतीन तासांत!

0
377
जामखेड न्युज – – – 
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या बाजूने हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. हा महामार्ग जाणाऱ्या दहा जिल्ह्यांतील स्थानिक प्रशासन आणि रेल्वे कमिटीदेखील कामाला सुरुवात करणार आहे. लवकरच या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करून जागतिक बँकेला सादर केले जाईल. यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परदेशातील विशेषत: चीनसारख्या देशात धावणाऱ्या सुसाट बुलेट ट्रेन प्रत्येकाच्या आकर्षणाचा भाग. भारतातही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वादाचे सूर कानी पडतात. आता मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. अवघ्या साडेतीन तासांत मुंबई-नागपूर हे अंतर कापले जाणार आहे. राज्य सरकारसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात येत असताना आता सरकारने या मार्गालगतच्या ‘हायस्पीड ट्रेन’च्या प्रकल्पावर फोकस केला आहे. जुलैमध्ये बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सादरीकरणदेखील करण्यात आले. पण, करोनाच्या संकटासोबतच कोकणातील महापुराने उद्भवलेली आर्थिक परिस्थिती पाहता बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात आकाराला येणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सात कॉरिडॉरचे काम
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला रेल्वे मंत्रालयालयाने सात हायस्पीड रेल कॉरिडॉरसाठी डीपीआर तयार करण्याचे अधिकार दिले आहेत. प्रस्तावित मुंबई-नागपूर हा दुसरा प्रकल्प असून मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरनंतर मुंबईवरून सुरू होईल. केंद्र आणि राज्य सरकार असा हा संयुक्त उपक्रम असून मुंबईहून नागपूरकडे जाताना राज्याच्या ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर अशा दहा जिल्ह्यांमधून ही हायस्पीड बुलेट ट्रेन जाणार आहे. ७३९ किलोमीटर लांबीच्या मार्गात उन्नत ग्रेडमध्ये आणि बोगद्यातूनदेखील ही रेल्वे जाईल. ७५० प्रवासी क्षमतेची ही गाडी राहील.
प्रकल्पाची गरज
– रस्त्याने अंतर : – ८४४ किमी (१५.४७ तास)
( विद्यमान रस्ता वापरून)
– विमानाने अंतर : ६८८ किमी ( ०१.४० तास)
– रेल्वेमार्गे अंतर : ८३३ किमी ( १०.५५ तास)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here