जामखेड विद्यार्थी रॅगिंग प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका व प्रभारी अधिक्षक निलंबित
सुभाष शितोळे मुख्याध्यापक तर अधिक्षक म्हणूनमधुकर महानुर
जामखेड अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा विद्यार्थी रॅगिंग प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे व प्रभारी अधिक्षक गजेंद्र होगले निलंबित करण्यात आले आहेत तर शाळेचे शिक्षक सुभाष शितोळे मुख्याध्यापक तर अधिक्षक म्हणून मधुकर महानुर यांच्या कडे पदभार देण्यात आला आहे.
जामखेड शहरातील आरोळेनगर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. शोभा चांदोबा कांबळे व सहायक ग्रंथपाल तथा प्रभारी अधिक्षक खंडू गजेंद्र होगले यांना निलंबित करण्यात आले असुन दि.३०/०४/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे पुणे विभागाचे समाज कल्याण, आयुक्त, ओम बकोरीया यांनी तसे आदेश काढले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड शहरातील आरोळेनगर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा या ठिकाणी दि. २०.०४.२०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजता तसेच दि. २१.०४.२०२५ रोजी दुपारी १.४५ वाजता लहान विद्यार्थ्यांना मोठ्या विद्यार्थ्यांनी हाताने व बेल्टच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर मारहाण करत रॅगिंगचा प्रकार करण्यात आला होता.
त्याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे समाजात मोठा असंतोषही निर्माण झाला होता. मात्र सदर घटना घडून तीन दिवस झालेनंतरही या शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे व प्रभारी अधिक्षक खंडू होगले यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठ कार्यालयास कोणतीही लेखी माहिती अथवा तोंडी कल्पना दिली नाही. याबाबत सोशल मिडीया व राज्यातील विविध पक्षसंघटना व पत्रकार यांनी उठाव केल्यानंतर समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांनी सदरची बाब अत्यंत गंभीर असल्याने त्यास जबाबदार असलेल्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे व सहा. ग्रंथपाल तथा प्रभारी अधिक्षक खंडू होगले या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कामकाजात कुचराई व बेजबाबदारपणाबद्दल दि. ३० एप्रिल रोजी निलंबनाची कारवाई केली आहे.
ही कारवाई समाज कल्याण विभागाचे महाराष्ट्र राज्य पुणे विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केली असून अहिल्यानगरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंट्टीवार यांच्या मार्फत अंमलबजावणी करण्यात आली आहे.
तर माहितीस्तव प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई, मा. महालेखापाल, मुंबई / नागपूर. व कार्यवाहीस्तव प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक ,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अहिल्या नगर, कोषागार अधिकारी संबंधित प्रभाग- आस्थापना शाखा. यांना प्रति पाठवण्यात आल्या आहेत.
दरम्यान शासकीय निवासी शाळेचे कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने पुढील आदेशापर्यंत दि.०१/०५/२०२५ पासून मुलांची शासकीय निवासी शाळा, आरोळेनगरचे मुख्याध्यापक म्हणून सहायक शिक्षक सुभाष शितोळे तर अधिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ लिपिक मधुकर महानुर यांचेवर सोपवण्यात आला आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा येथील मुख्याध्यापिका शोभा कांबळे व सहा. ग्रंथपाल तथा प्रभारी अधिक्षक खंडू गजेंद्र होगले यांचे निलंबन काळात अहिल्यानगर येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुख्यालय हे मुख्यालय असणार आहे.