चौंडी येथील ऐतिहासिक कॅबिनेट बैठकीत अहिल्यादेवींचे स्मृतीस्थान जतन आणि संवर्धनाकरता कोट्यवधींचा निधी, अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालय

0
161

जामखेड न्युज—–

चौंडी येथील ऐतिहासिक कॅबिनेट बैठकीत अहिल्यादेवींचे स्मृतीस्थान जतन आणि संवर्धनाकरता कोट्यवधींचा निधी,

अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालय

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत स्तरावरील राज्यातील पहिलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथे ऐतिहासिक मंत्रिपरिषद घेण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. चौंडी येथे अहिल्यादेवी होळकरांचे स्मृतीस्थान जतन आणि संवर्धनाकरता कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असून अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


कॅबिनेट बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.


“चौंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मृतीस्थळ जतन आणि संवर्धनाकरता ६८१ कोटींचा आराखडा मान्य केला आहे. यातून विविध प्रकारची कामं होतील. अखिल भारतीय स्तराचं एक प्रेरणास्थळ आणि तीर्थस्थळ म्हणून हे तयार झालं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न केला आहे. यासोबत त्रिशताब्दीचं औचित्य साधून याच बैठकीत अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार १४७ कोटी रुपये,

श्री क्षेत्र तुळजा भवानी मंदिर विकास आराखडा १८६५ कोटी, श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा २५९ कोटी रुपये, त्र्यंबकेश्वर विकास आराखडा २७५ कोटी रुपये, श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा १४४५ कोटी रुपये, श्री क्षेत्र माहुरगड विकास आराखडा ८२९ कोटी रुपये असे जवळपास ५ हजार ५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बहुभाषिक चित्रपट निर्माण करणार

 

“जे कार्य देशात अहिल्यादेवींनी केलं, तेच कार्य त्यांच्या त्रिशताब्दीनिमित्ताने राज्य सरकारच्या माध्यमातून करत आहोत. पुण्यश्लोक अहिल्या देवींचं जीवन आणि कार्य याचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे, या करता त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कर्मशिअल चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे”, असं ते म्हणाले.

अहिल्यानगरमध्ये मेडिकल कॉलेज

अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार. या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल. तसंच, अहिल्यानगरमध्ये खास मुलींकरिता आयटीआय तयार करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. एक नवीन महिला सक्षमीकरणाकरता आदिशक्ती अभियान राबवण्याचं ठरवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here