चौंडी मंत्रीमंडळ बैठकीसाठी भव्य दिव्य शामियाना, हजार कोटीच्या विकास आराखड्यावर होणार शिकामोर्तब?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव चौंडी येथे देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करेल आणि त्यांचे असामान्य कार्यकर्तृत्व सर्वांपर्यंत पोहोचेल असा चौंडी बहृत विकास आराखडा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आला आहे. तो तब्बल हजार कोटीचा असून ७० एकर जमिनीवर स्मारक होणार आहे. अहल्यादेवींचा १०८ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा, शिल्पसृष्टी व ३५० मिटर लांब व ४० फुट रुंद नैसर्गिक बेट उभारले जाणार आहे. यासह अनेक विविध कामे प्रस्तावित असल्याने श्रीक्षेत्र चोंडी पाहण्यासाठी पर्यटक येतील व अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास सर्वाना शिल्पसृष्टीतून उलगडणार आहे. या बहुचर्चित विकास आराखड्याला आज मंगळवार दि. ६ रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मूर्तस्वरूप येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चोंडी गाव वेड्या भाबळीने वेढलेले होते. १९९५ साली राज्यात भाजपसेनेची सत्ता आल्यावर ग्रामविकास मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी या ऐतिहासिक गावाचा चेहरामोहरा बदलण्यास सुरवात केली. शिल्पसृष्टी, अहिल्यादेवीचे शिल्प तसेच बगीचा यामध्ये लाकडी घोडे, हत्ती, सिंह तसेच ऋषिमुनी, श्रीराम, लक्ष्मण यांचे शिल्प उभारण्यात आले तसेच समाजमंदीर, आश्रमशाळा असे विविध कामे झाली. जयंती उत्सव व पुण्यतिथीलाच लोक येतात. या ऐतिहासिक स्थळाला म्हणावे असा प्रतिसाद मिळाला नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे माहेरचे नववे वंशज प्रा. राम शिंदे विधानपरिषदेच्या सभापती वर्णी लागताच त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जन्मगाव चौंडीला पर्यटनाचा दर्जा प्राप्त व्हावा यादृष्टीने विविध विकास कामे प्रस्तावित केली व तसा हजार कोटीचा विकास आराखडा तयार केला आहे. दि. १६ एप्रिल २०२५ रोजी मुंबईत विधान भवनात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्या बैठकीत सदर आराखडा स्थापत्य विशारद किरण कलमदानी यांनी सादर केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी ज्या ठिकाणी होतो, त्याच मैदानावर बैठकीसाठी विस्तीर्ण, असा मंडप उभारला जात आहे. 265 फूट लांब आणि 132 फूट रुंद आकाराचा ‘जर्मन हँगर’ प्रकारचा मंडप उभारला जात आहे. मंडपात विविध वातानुकूलित कक्ष निर्माण केले जातील. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसाठी ग्रीन रुम, भेटीसाठी येणारे आमदार-खासदार, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी कक्ष, मुख्य सचिवांचे कार्यालय, मंत्री परिषद सभागृह, स्वयंपाकघर, भोजन, पत्रकार कक्ष, सुरक्षा व वाहनचालक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
चौकट ७० एकर जमिनीवर स्मारक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा साधारण १०८ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा सीना नदीपात्रातील नैसर्गिक बेटावर उभारला जाणार आहे. त्यामध्ये अहिल्यादेवीचे जडणघडण दर्शविणारे आठ महत्त्वाचे टप्पे असलेले समूह शिल्प पूतळ्यालगत उभारले जाणार आहे. चौंडी लगत सीना नदीपात्रात ३५० मीटर लांब आणि ४० मीटर रुंदीचे नैसर्गिक बेट असून, त्यावरच हा भव्य पुतळा उभारला जाणार आहे, तर नियोजित पुतळ्यासमोरील नदीपात्रालगत असलेल्या एकूण ७० एकर जमिनीवर स्मारक होणार आहे.
चौकट मॉडेल व्हिलेज म्हणून चौंडीचा गाव उभा राहणार ——————————- अहिल्यादेवींच्या कार्यातून प्रेरणा घेत, चोंडीमध्ये जलसंवर्धन, वृक्षारोपण, पर्यावरण स्नेही रचना आणि पारंपरिक शैली यांचा समन्वय साधून एक मॉडेल गाव उभं करण्याचा मानस आहे. हा प्रकल्प ग्रामीण भागाच्या विकासाचा नवा आयाम ठरेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण, त्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक, चोंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चोंडीश्वरी मंदिर जीर्णोद्धार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
राज्यमंत्रीमंडळ बैठकीबाबत आ. रोहीत पवार यांची अपेक्षा
श्रीक्षेत्र चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे त्याचे स्वागत आहे. कर्जत-जामखेड तालुक्याला शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या विविध योजना व नवीन योजनेला ताकद देण्यासाठी जो पाठपुरावा केला आहे. याबाबतचे पुरावे विविध मंत्र्यांना दिले आहेत त्याच्या मंजुरीची घोषणा करावी. व सदर योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने सुरू होईल. चोंडी गावातील विकास आराखडा तयार केला आहे त्याचा पाठपुरावा मी केला आहे त्यास मान्यता मिळावी. सिना नदीवरील सहा केटी वेअर बांधा-यांना मान्यता मिळावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जे बारव बांधले आहे त्याचे पुनर्जीवन करावे तसेच त्यांचे वाडे धार्मिक स्थळांचे दुरूस्त करून ते लोकांना वापरायला द्यावे. तसेच पाटेगाव येथील औद्योगिक वसाहतीला मंजुरी द्यावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ३१ मे रोजी होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलावून सर्वसमावेशक साजरी करावी