शरद पवार गटाचे आमदार राम शिंदेंच्या भेटीला, चोंडीत बंद दाराआड अर्धा तास चर्चा, राज्याच्या राजकारणात खळबळ
आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांनी शनिवारी सायंकाळी विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेतली. संचालक मंडळासमवेत शरद पवार गटाचे आमदार तथा कारखान्याचे चेअरमन आ. नारायण आबा पाटील हेही उपस्थित होते. कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवल्याबद्दल प्रा राम शिंदे यांनी आमदार नारायण पाटील व सर्व संचालकांचा सत्कार केला. त्यानंतर शिंदे व पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये अँन्टी चेंबरमध्ये तब्बल अर्धा तास बैठक झाली. शरद पवार गटाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सभापती प्रा राम शिंदे यांची शनिवारी सायंकाळी घेतलेली भेट राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चेत आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणुक पार पडली. या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने कारखान्याची सत्ता हस्तगत केली. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या निवडणुकीत आपल्याच पक्षाचे आमदार नारायण पाटील यांच्या पॅनल विरोधात काम केले होते. रोहित पवार विरोधात असतानाही नारायण पाटील यांच्या पॅनलने कारखाना निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवला आणि कारखान्यावर एकहाती सत्ता स्थापन केली. त्यामुळे ही निवडणूक राज्यात चांगलीच गाजली होती.
जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चोंडी येथे ६ मे रोजी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीच्या तयारीच्या नियोजनात विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे हे व्यस्त असतानाच आदिनाथ साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने शनिवारी सायंकाळी सभापती प्रा राम शिंदे यांची चोंडी येथे भेट घेतली. यावेळी सर्व संचालकांनी प्रा शिंदे यांचे आभार मानले. यावेळी प्रा राम शिंदे यांनी कारखान्याचे चेअरमन तथा शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील व सर्व संचालक मंडळाचा यथोचित सत्कार केला. शेतकरी हितासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा शब्द यावेळी त्यांनी सर्व संचालकांना दिला.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालक दत्तात्रय गव्हाणे, श्रीमान चौधरी, महादेव पोरे, वसंत अंबारे, रविकिरण फुके, दशरथ हजारे, किरण कडवे, नवनाथ झोळ, संतोष पाटील, दत्तात्रय देशमुख, विजय नवले, अमोल घाडगे, देवानंद बागल, राहुल सावंत, राजेंद्र कदम, दादासोहब पाटील, हरिदास केवारे, सौ.राधिका तळेकर, सौ.उर्मिला सरडे तसेच पांडुरंग उबाळे, सोमनाथ पाचरणे, एकनाथ हजारे, उमेश रोडे, पै. बाबा महारनवर, डाॅ पांडुरंग हजारे, राजेंद्र हजारे, रामलिंग हजारे, डाॅ किसनराव हजारे, अंकुश ढवळे सह आदी उपस्थित होते.
चौकट
शरद पवार गटाचे आमदार तथा आदिनाथ साखर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन आमदार नारायण (आबा) पाटील यांनी शनिवारी सायंकाळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांची चोंडी येथे भेट घेतली. शिंदे व पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये शिंदे यांच्या निवासस्थानी बंद दारा आड ( अँटी चेंबरमध्ये) तब्बल अर्धा तास बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशिल समजु शकला नाही. शिंदे व पाटील या दोन नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली असेल ? याचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.