चहा विक्रेत्याचे दोन्ही मुले डाॅक्टर, एकाचे एमबीबीएस पुर्ण तर दुसरा मुलगा दुसऱ्या वर्षाला
जामखेड शहरात पुढारी वड म्हणून सर्व परिचित आहे. याठिकाणी अनेक वर्षांपासून बंडू ढवळे यांचे चहाचे हाॅटेल आहे. खास चहा घेण्यासाठी शहरातील चारही कोपऱ्यातून लोक येतात, ढवळे यांच्या चहाची चवच न्यारी आहे. एकदा का येथील चहा घेतला की चहाची तलफ झाली कि, मित्रमंडळी येथेच चहा पिण्यासाठी येतात, यात स्पेशल चहा, साधा चहा, ब्लॅक टी, मसाला दुध, विलायची दुध असे कितीतरी प्रकार आहेत. स्वच्छता, टापटीप पणा, तत्पर सेवा, ग्राहकांना थंडगार अँरो फिल्टर पिण्याचे पाणी या सर्वांचा परिणाम जामखेड परिसरात पुढारी वड टी सेंटर एक ब्रँड झाले आहे. या ठिकाणी सर्व राजकीय व्यक्ती, नेते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी वर्ग आवर्जून चहा साठी येतात. जरी चहाची टपरी चालवली तरी ढवळे यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या अभ्यासाकडे लक्षदिले. एका मुलाचे एमबीबीएस पुर्ण झाले तर दुसरा दुसऱ्या वर्षाला आहे. नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या पदवीदान समारंभात मुलाची पदवी घेताना वडिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.
जामखेड शहरातील नगर रोडवर, पंचायत समिती शेजारी असलेल्या प्रसिद्ध ‘पुढारी वड’ येथील ‘हॉटेल पुढारी’चे संचालक प्रकाश उर्फ बंडू ढवळे यांचे चिरंजीव डॉ.प्रदीप प्रकाश ढवळे यांनी आपली एमबीबीएस पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई येथील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमधून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलं असून नुकताच पदवीदान समारंभ पार पडला तर दुसरा मुलगा रोहित सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एमबीबीएस च्या दुसऱ्या वर्षाला आहे.त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जामखेड शहरासह मातकुळी, आष्टी परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
दुसरा मुलगा रोहित हा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील प्रकाश हाँस्पीटल अँड रिसर्च सेंटर या काॅलेज मध्ये द्वितीय वर्षाला आहे.
डॉ. प्रदीप व रोहित यांचे बालपण अगदी सामान्य परिस्थितीत गेले. वडिलांचे वडाच्या झाडाखाली चहाचे लहानसे हॉटेल सांभाळत त्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. डॉ.प्रदीप व रोहित यांनी देखील त्यांच्या कष्टाचे चीज करीत अत्यंत कठोर अभ्यास, शिस्त आणि धैर्य याच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणात प्रवेश मिळवला डॉ. प्रदीप चे एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे तर रोहित दुसऱ्या वर्षाला आहे.
या यशानंतर जामखेडमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, राजकीय व प्रशासकीय व्यक्ती तसेच स्थानिक नागरिक आणि मित्रमंडळींनी डॉ. प्रदीप यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. अनेक जणांनी सामाजिक माध्यमांवरून शुभेच्छांचा वर्षाव करत, त्यांच्या यशाचे कौतुक केले आहे.
डॉ. प्रदीप व रोहित यांचे यश हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण जामखेडसाठी अभिमानाची बाब आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असल्यास कोणतीही पार्श्वभूमी आड येत नाही असेच डॉ. प्रदीप व रोहित ने दाखवून दिले आहे.
जामखेडसारख्या ग्रामीण भागातून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवणे ते पुर्ण करणे हे नक्कीच प्रेरणादायी आहे. डॉ. प्रदीप यांचे एमबीबीएस पुर्ण झाले आहे आता त्यांचा मानस एमडी करण्याचा आहे. लवकरच एमडी चे शिक्षण ते पुर्ण करणार आहेत.त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांची शुभेच्छा दिल्या असून, भविष्यात समाजासाठी चांगली सेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. प्रदीप व रोहित यांनी आदर्श निर्माण केला आहे.