बनावट सोने प्रकरणाची उकल करण्याचे जामखेड पोलीसांपुढे आव्हान
आणखी काही बँका व पतसंस्थेत बनावट सोने असण्याची शक्यता ?
नुकतेच कॅनरा बँक जामखेड शाखेत तीन खातेदारांनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून तब्बल १७ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले होते. यात आरोपी पोलीस कोठडी संपवून न्यायालयीन कोठडीत आहेत लवकरच त्यांना जामीनही होईल. पण बनावट सोने प्रकरणात एक टोळी कार्यरत असून त्यांच्या मुळापर्यंत जाण्याचे जामखेड पोलीसांपुढे आव्हान आहे. आणखी काही पतसंस्थेत व बँकेत खोटे सोने असल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात जामखेड शहरात सुरू आहे.
कॅनरा बँक बनावट सोने फिर्यादीनुसार, आरोपींनी गोल्ड व्हॅल्युअर (सोने तपासणी अधिकारी) याच्याशी संगनमत करून बनावट दागिने तारण ठेवले होते. हे प्रकरण १३ मार्च २०२५ रोजी कॅनरा बँकेच्या नाशिक येथील क्षेत्रीय कार्यालयातर्फे पाठविण्यात आलेल्या स्वतंत्र व्हॅल्युअरने तपासणी करताना उघडकीस आले.
फसवणूक करणाऱ्यांमध्ये मुन्वर अजीम खान पठाण (रा. नुराणी कॉलनी), अनिता संतोष जमदाडे (रा. बाजारतळ), व दिगांबर उत्तम आजबे (रा. आजबे वाडा, मेन रोड) यांचा समावेश आहे. तर गोल्ड व्हॅल्युअर आण्णासाहेब कोल्हे (रा. शिवम ज्वेलर्स, जामखेड) याच्यावर फसवणुकीत सहभागी असल्याचा आरोपी आहेत.
तपासणीत असे आढळले की, आरोपींनी एकूण ३९५.९ ग्रॅम वजनाचे बनावट दागिने खरे असल्याचे भासवून बँकेत तारण ठेवले होते. त्या बदल्यात संबंधित खातेदारांनी १७,७३,०००/- रुपयांची कर्जरक्कम घेतली होती. ही रक्कम त्यांच्या सेव्हिंग खात्यावर जमा करून नंतर त्यांनी काढून घेतली.
विशेष म्हणजे, यातील दोन कर्ज प्रकरणे बँकेच्या माजी मॅनेजर पूजा शर्मा आणि अधिकारी सुनील बारसे यांच्या कार्यकाळात मंजूर झाली होती, तर तिसरे प्रकरण सद्य मॅनेजर आनंद डोळसे यांच्या काळात झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, तारण ठेवलेले बनावट दागिने पुढीलप्रमाणे आहेत:
या प्रकरणी बँकेने संबंधित खातेदार आणि गोल्ड व्हॅल्युअर यांच्या विरोधात फसवणूक, कट रचणे व विश्वासघात यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी तक्रार दाखल केली असून पुढील तपास जामखेड पोलिस निरीक्षक महेश पाटील करत आहेत. कॅनरा बँक शाखा, जामखेड येथे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. या फसवणुकीत एकूण १७.७३ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या चार आरोपींशिवाय उथळ माथ्याने शहरात फिरणारे काही लोक या कटात असण्याची शक्यता आहे.
आणखी काही पतसंस्था व बँकेत गोल्ड व्हॅल्युअरला हाताशी धरून बनावट सोने असल्याची चर्चा जामखेड शहरात आहे तसेच काही सोनारांनाही काही ठगांनी गंडा घातलेला आहे. आगोदर चार दोन व्यवहार रोख स्वरूपात तसेच असली सोने देऊन करायचा नंतर अचानक दुकानात जाऊन काही तरी अडचण सांगून किंवा बनावट सोने ठेवून काही लाखात रक्कम उकळतात आणि नवनवीन दुकानदार शोधतात परत पैसे देतच नाहीत.
बनावट सोने प्रकरणात एक टोळी कार्यरत असून त्यांच्या मुळापर्यंत जाण्याचे जामखेड पोलीसांपुढे आव्हान आहे. आणखी काही पतसंस्थेत व बँकेत खोटे सोने असल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात जामखेड शहरात सुरू आहे. लवकरात लवकर जामखेड पोलीसांनी या ठगांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.
काही ठग गोल्ड व्हॅल्युअरशी संधान साधून बनावट सोने बँकेत ठेवतात व एक दोन वर्षे पैसे वापरतात नंतर पैसे भरून बनावट सोने घेतात व दुसरी पतसंस्था किंवा बँक शोधतात अशा प्रकारे अनेक टोळ्या परिसरात कार्यरत आहेत. याचा पर्दाफाश होणे आवश्यक आहे.