आदर्श शिक्षक संदीप पवार यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025 चा पुरस्कार प्रदान
महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट-अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली होती त्यात, शिक्षक कॅटेगरीसाठी संदीप पवार सरांचे नाव होते.
संदीप पवार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. ते विद्यार्थी हितदक्ष व नवोपक्रमशील आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांना महाराष्ट्रातील मानाचा असणारा सर्वोच्च सन्मान लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025_हा अवॉर्ड राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते राजभवन मुंबई येथे बुधवार 19 मार्च रोजी प्रदान करण्यात आला. याबद्दल त्यांच्या वर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संदीप पवार जिल्हा परिषद शाळा जरेवाडी ता. पाटोदा जि. बीड येथील शाळा गावातील बहुतेक सर्व लोक सहा महिने ऊसतोडणी साठी स्थलांतरित असतात. त्यामुळे ज्या वेळी संदीप पवार सर जरेवाडी येथे १९९५ हजर झाले त्यावेळी जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत एक शिक्षक शाळेची पटसंख्या केवळ २४ होती.
संदीप पवार सरांनी अहोरात्र मेहनत घेत विद्यार्थी पालक यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शाळेचा कायापालट केला.
आज जरेवाडी येथे शाळेच्या २५ वर्गखोल्या असून २० शिक्षक आणि ८०० विद्यार्थी आहेत. यातील जरेवाडीतील ५० मुले आणि बाहेरील ७५० मुले अन्य खेडेगावातील आहेत.
१० वर्षात ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. विद्यार्थ्यांचे स्थलांतर शून्य टक्के आणले.
• मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत बीड जिल्ह्यात शाळा प्रथम आणि विभागात तृतीय येऊन ११ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.
• आय.एस.ओ. मानांकन मिळविणारी बीड जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. अशा या उपक्रमशील विद्यार्थी हितदक्ष गुणी शिक्षकाला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025 चा पुरस्कार मिळाला आहे. यामुळे संदीप पवार यांच्या कामाचे खरोखरच चिज झाले आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जरेवाडी शाळेत प्रत्येक वर्गाच्या दोन दोन तुकड्या असून जून २०१० पासून सेमी इंग्रजी माध्यम स्वीकारून २०१५ पासून सर्वच वर्ग हे सेमी इंग्रजी माध्यमाचे करण्यात आलेले आहेत. गुणवत्ता आणि दर्जा राखत उपक्रमशीलता जोपासल्यामुळे या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी आसपासच्या सुमारे ५२ ते ५५ गावांतून विद्यार्थी येतात. जागेचा प्रश्न समाजसहभागातून शाळेने सोडवला. त्यामुळे खेळाचे मैदान, डिजिटल हॉल आणि प्रयोगशाळा उभी राहिली.
समाज सहभागातून शाळेने उभारलेल्या निधीतून शाळा विकासाची कामे पूर्ण झाली. वर्गखोल्या, वृक्षारोपण, पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर, मैदानात ब्लॉक्स, डिजिटल शैक्षणिक साहित्य, प्रत्येक वर्गात अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही, एलसीडी प्रोजेक्टर आणि १० कॉम्प्युटरने सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, प्रयोगशाळा, सौरऊर्जा पॅनल, खगोलशास्त्र क्लब, कलादालन, वर्गामध्ये साऊंड सिस्टिम आणि सीसीटीव्ही कॅमेरा, आकर्षक रंगरंगोटी, बोलक्या भिंती अशी कामे केलीत. शाळेतील माजी विद्यार्थ्यीही शाळेला वस्तुरूपाने मदत करत असतात.
आजपर्यंत पाचशेहून अधिक विद्यार्थी स्कॉलरशिपधारक, तर २२ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नवोदय प्रवेशासाठी निवड झालेली आहे. NMMS व स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जरेवाडी शाळा अग्रेसर असते. क्रीडा स्पर्धा, राज्य विज्ञान प्रदर्शन, विभागीय नाट्यस्पर्धा, निबंध स्पर्धा, स्काउट गाइड जिल्हा मेळाव्यात जरेवाडी शाळेचा सहभाग असतो. महत्त्वाचे म्हणजे गावात व्यसनमुक्ती करण्यात शाळेला यश मिळालेले आहे.
गत पंधरा वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरामध्ये ‘ज्ञानवर्धिनी’ हे हस्तलिखित प्रकाशित केले जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेले काव्यसंग्रह, गुणवत्ता विकास सराव परीक्षा, प्रश्नमंजूषा, प्रज्ञाशोध परीक्षा, राष्ट्रीय सणानिमित्ताने कोण होईल ज्ञानवंत? गणित समृद्धी उपक्रम, गोष्ट विज्ञानाची, विज्ञान केंद्र या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली जाते.
जरेवाडी गावातील जवळपास ऐंशी टक्के पालकांचे ऊसतोडणीसाठी दरवर्षी स्थलांतर होते. परंतु शाळेच्या नियोजनामुळे गेल्या बावीस वर्षांत एकाही विद्यार्थ्याचे कारखान्यावर स्थलांतर झाले नाही. अथवा एकाही विद्यार्थ्याने मध्येच शाळा सोडलेली नाही. या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या माध्यमातून सोय उपलब्ध करून स्थलांतराच्या समस्येवर मात केली आहे.
जरेवाडी शाळेचा संगीतमय परिपाठ वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध गुणवैशिष्ट्यांमुळे राज्यभरातील तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक लोकांनी शाळेला शनिवारी भेट दिली आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ व शिक्षक पालक संघ सतत प्रयत्नशील असतो.