मृतदेहाला परमेश्वर अन् स्मशानाला मंदिर मानणारे दत्ता आजबे
आतापर्यंत दोन हजारांवर अंत्यविधी
स्मशान, मृतदेह, अंत्यविधी हे शब्द उच्चारले, तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. सुखाच्या कार्यक्रमात मदतीला धावणारे अनेक जण असतात; पण अंत्यविधीसारख्या दु:खाच्या कार्यात निर्विकार भावाने हाताची घडी घालून उभे राहाणाऱ्यांची संख्या जास्त असते. समाजातील हा विरोधाभास त्यांना बोचला. म्हणून त्यांनी मृतदेहात परमेश्वर पाहिला आणि स्मशानाला मंदिर मानून आजपर्यंत दोन हजारांवर अंत्यविधी पार पाडले आहेत.
मृत कुटुंबीयांच्या दु:खावर फुंकर मारणारी कृतिशील समाजसेवा. जामखेड शहरासह, पंचक्रोशीत कोणाच्याही घरी दु:खद घटना घडो, दत्ता काळे तात्काळ हजर होतात. दु:खात जग जेव्हा शब्दरुपी सांत्वनात गुंतते त्यावेळी कृतिशील सांत्वन करणारा अवलिया म्हणजे जामखेड शहरात राहणारे ७९ वर्षीय दत्ता उत्तम आजबे हे आहेत.
दत्ता आजबे संवेदनशील मनाचे गृहस्थ. त्यांच्यात ही संवेदनशीलता आली, त्याच्या ती आई- वडिलांच्या संस्कारामुळे. घरची गरिबी असली, तरी दत्तारावांच्या आई-वडिलांनी संस्काराची श्रीमंती जाणीवपूर्वक जपली. म्हणून संवेदनशील मनाचे दत्ता घडले.
परिस्थिती नसतानाही संघर्षाच्या जोरावर जुन्या जमतेम शिकले. शिक्षणामुळे समाजाचे भीषण वास्तव आणखी कळू लागले, तसे बबनराव अस्वस्थ होऊ लागले. आभाळ इतकं फाटलं, की आपण शिवण्यासाठी पुरे पडणार कुठे? या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळत नसे, म्हणून दत्ताराव आणखी अस्वस्थ होत असत.
अशा परिस्थितीत सन २०१८ ला ते एका अंत्यविधीला गेले. अंत्यविधीसाठी नातलग, आप्तेष्ठांची गर्दी जमली; परंतु अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडण्यासाठी कुणीही पुढाकार घेईना, हे लक्षात येताच दत्तारावांनी तो अमक्या समाजाचा तो तमक्या समाजाचा हे बाजूला ठेवत तो अंत्यविधी पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारामुळे उशिरा का होईना, अंत्यविधी पार पडला.
कुटुंबीय, आप्तेष्ठांसाठी तो अंत्यविधी संपला असला, तरी तो समाजाच्या सेवेसाठी वाट शोधणाऱ्या दत्तारावांसाठी नवी सुरुवात करणारा ठरला. सुखात तर सगळेच मदत करतात; पण दु:खात मदतीसाठी कुणीही लवकर पुढे येत नाही. आपण दु:खितांचे अश्रू मदतीतून पुसायचे, असे घरी आल्यावर दत्तारावांनी ठरवले आणि सुरू झाली, दत्तारावांची मृत कुटुंबीयांच्या दु:खावर फुंकर मारणारी कृतिशील समाजसेवा. जामखेड शहरासह,पंचक्रोशीत कोणाच्याही घरी दु:खद घटना घडो, दत्ताराव तात्काळ हजर होतात. अंत्यविधीचे सर्व सामान गोळा करतात. मृताच्या कुटुंबीयांना दु:ख आवरायला लावून विधीची माहिती देतात.
अंत्ययात्रा, अंत्यविधी ते रक्षाविसर्जनापर्यंत सर्व सोपस्कार स्वत: उभे राहून पार पाडतात. मृत व्यक्तीसाठी नातेवाईक कपडे आणतात. ते बहुतांश लोक अंत्यविधीप्रसंगी जाळून टाकतात. असे आणलेले कपडे दत्ताराव जाळू न देता गोर गरिबांना देऊन टाकतात. ज्या कुटुंबीयांच्या घरी दु:खद घटना घडली असेल, त्या कालावधीत बाजारचा दिवस आला, तर लहान मुलांसाठी पदरमोड करून दत्ताराव खाऊही घेऊन जातात.
अंत्यविधीसाठी मदत करताना त्यांना भीती वाटत नाही. मृतदेह परमेश्वर आहे, असा आपल्या शास्त्रात उल्लेख आहे. म्हणूनच आपण पार्थिवाचे दर्शन घेतो. मग त्याला घाबरायचे कशासाठी? असा दत्तारावाचा सवाल. राहिला प्रश्न स्मशानाचा. स्मशानाविषयी त्यांचे विचार अत्यंत सुंदर. सर्वांचे सारखे स्वागत करते, ते स्मशान. प्रेत परमेश्वर असेल, तर त्याचे आनंदाने स्वागत करणाऱ्या स्मशानाला मंदिर का मानू नये, स्वर्ग, नरकाविषयी त्यांचे विचार तितकेच स्पष्ट. एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीसमयी गेलेल्या व्यक्तीविषयी लोक चांगले बोलत असतील, तर तोच खरा स्वर्ग, आणि गेलेल्या व्यक्तीविषयी लोक वाईट बोलत असतील, तोच खरा नरक, असे दत्तारावाना वाटते. त्यांनी गेली २० ते २५ वर्षात सुमारे २ हजारांच्यावर अंत्यविधी पार पाडण्यास मदत केली.
आज छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तरुण दु:खी होतात. अशा तरुणाईला दत्तारावाचा संदेश आहे की, आपलं दु:ख धरून बसणारा मरेपर्यंत स्वत:साठी जगतो. इतरांचं दु:ख कमी करण्यासाठी झटणारा खऱ्या अर्थाने समाजासाठी जगतो. तुम्हाला कुणासाठी जगायचं, हे आधी ठरवा.