सभापती प्रा राम शिंदे व युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांचा वाढदिवस होणार कीर्तनाने साजरा
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांच्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसा निमित्त तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जामखेड तालुकाध्यक्ष व जवळा गावचे मा सरपंच प्रशांत शिंदे यांच्या २४ डिसेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त जवळा (ता. जामखेड) येथे भव्य, भक्तीमय व समाजप्रबोधनपर हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे संपूर्ण जवळा परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
या पावन प्रसंगी समाजप्रबोधनकार, विचारवंत व युवा कीर्तनकार म्हणून राज्यभर परिचित असलेले ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे अमृततुल्य, प्रेरणादायी व संस्कारक्षम हरिकीर्तन गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता श्री. जवळेश्वर मंदिरासमोर, जवळा येथे संपन्न होणार आहे. त्यांच्या कीर्तनातून संतपरंपरा, भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये, सामाजिक सलोखा व राष्ट्रभक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडत असतात.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे हे आपल्या अभ्यासपूर्ण, ओघवत्या व तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या कीर्तनशैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या कीर्तनातून केवळ भक्तीभाव नव्हे तर समाजातील विविध प्रश्नांवर प्रबोधनात्मक भाष्य केले जाते. त्यामुळे या हरिकीर्तन सोहळ्याला परिसरातील भाविक, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या धार्मिक उपक्रमामागे समाजात सद्भावना, एकोपा व सकारात्मक विचारांचा प्रसार व्हावा, तसेच तरुण पिढीला संतविचारांची ओळख व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. वाढदिवसानिमित्त कोणताही दिखाऊ कार्यक्रम न करता अध्यात्मिक व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
या भव्य धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन प्रशांत भाऊ शिंदे मित्रमंडळ, जवळा (जिल्हा परिषद गट) यांच्या वतीने करण्यात आले असून, गावातील सर्व नागरिक, भाविक व कीर्तनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तीरसाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्रमंडळाचे सदस्य व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.