जामखेड शहरापासून दोन कि.मी.अंतरावरील साकत फाट्याजवळील एका घरावर एका महीलेस सात ते आठ दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवून घरातील 8 तोळे सोने व 71 हजार रुपयांचे रोख असे एकुण 3 लाख 22 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केला. विषेश म्हणजे या दरोड्यात एका महिलेचा समावेश असुन घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट दिली आहे. दरोड्याच्या घटनेने जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली अशी की, जामखेड शहरापासून दोन कि.मी.अंतरावरील बीड रोड येथील साकत फाट्याजवळ फिर्यादी महीला प्रतिक्षा शंकर रोकडे वय 19 ही नृत्यांगना आपल्या कुटुंबा समवेत रहात आहे. तसेच याच ठिकाणी वरच्या मजल्यावर देखील गायत्री किसन जाडकर या रहात आहेत.
आज बुधवार दि 26 रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी एका महिला दरोडेखोरासह सात ते आठ दरोडेखोर आले. यावेळी सोबत असलेल्या आरोपी महिलेने फिर्यादी यांचे दार वाजवत आवाज दिला की ताई दार उघड, त्यामुळे फिर्यादी महीलेस आपलेच कोणी आले आहे का अशी समजुत झाली त्यामुळे फिर्यादी महीलेने दार उघडले.
घराचे दार उघडताच घरामध्ये स्कार्फ बांधलेल्या महिलेसह चोरटे आत शिरले. यानंतर चोरट्यांनी फिर्यादी महीलेच्या घरातील तसेच किचन मधिल सामानाची उचकापाचक केली व घरामध्ये धुमाकूळ घातला. तसेच चोरट्यांनी फिर्यादी महीलेस चाकुचा धाक दाखवून सोने व रोख रक्कम चोरली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा वरच्या मजल्यावर रहात असलेल्या गायत्री किसन जाडकर यांच्या घराकडे वळवला यावेळी घराला कुलुप असल्याने चोरट्यांनी दार तोडुन घरातील रोख रक्कम व सोने चोरुन नेले. अशा प्रकारे दोन्ही घरातील एकुण 2 लाख 51 हजार रुपयांचे आठ तोळे सोन्याचे दागिने व 71 हजार 750 रु रोख असा एकुण 3 लाख 22 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केला.
या घटनेत एक महीला कीरकोळ जखमी झाली आहे. दरोडा पडला असल्याची माहिती फिर्यादी यांनी फोनवरून जामखेड पोलीसांना दिली यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी आले मात्र तोपर्यंत दरोडेखोर पळुन गेले. घटनास्थळी सकाळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, जामखेड पोलीस स्टेशनचे सपोनि सोनवलकर, सपोनि वर्षा जाधव मॅडम व जामखेड व अहील्यानगर चे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भेट दिली.
या प्रकरणी एका महिलेसह एकुण सात ते आठ दरोडेखोरांवर जामखेड पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वर्षा जाधव या करत आहेत.