जामखेड न्युज——
राज्यस्तरीय कवी संमेलनात प्रेमाच्या कवितांबरोबरच इतर कवितांनी जामखेडकर मंत्रमुग्ध
राज्यातील नामवंत कवींच्या उपस्थितीत जामखेड मध्ये कवी संमेलन उत्साहात संपन्न
कवीवर्य कै. आ.य.पवार यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व मराठी साहित्य प्रतिष्ठान, जामखेडच्या वतीने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन गुरुवार दि. 6/02/ 2025 रोजी जामखेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी मा. विजयकुमार मिठे हे होते. मराठी साहित्य प्रतिष्ठानचे हे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा.ना.प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य मा.प्रकाश होळकर व डॉ.राजेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
एक दिवस चालणाऱ्या या संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ पुरस्कार वितरण, कवी संमेलन असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सायंकाळी राज्यभरातील नामवंत कवींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात कवी संमेलन संपन्न झाले. यात जामखेड मधील डॉ. जतीन काजळे, गोकुळ गायकवाड, रंगनाथ राळेभात, मारूती काळदाते, डॉ. संजय राऊत, कुंडल राळेभात यांनी आपल्या कविता सादर केल्या.
कवी संमेलनाचे अध्यक्ष शंकर वाडेवाले हे होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हनुमंत चांदगुडे, संतोष सेलुकर यांनी केले.
नामवंत कवींनी या कविता केल्या सादर
शंकर वाडेवाले
किती दळावं दळण
दाणे रडती जात्यात
रगुताचे पाजळणे
खडीसाखरी नात्यात
मंदिराच्या गाभाऱ्यात
येई मरणाला चेव
लाविला मी लेप तुझा
मरणाचं काय भेव
डाॅ.संतोष सेलूकर,परभणी
बंगल्यासमोर मजला दिसते थोडी उणीव आता
चकचकीत फरशी बघून येते मज कीव आता
होऊ दे दारी चिखल
भरुदे मातीत पाय तरी
अंगणातल्या काळ्या
मातीतच गुंततो माझा जीव आता
माती सजीव आहे मातीस जीव लावा
बदलून रुप ये त्या कातीस जीव लावा
ही जात आमुची नाही काम टाळणारी
कष्टात राहते त्या जातीस जीव लावा
रामदास कांबळे, लातूर.
बाप असतो घराचा चाक
माय वंगण त्या चाकाचे
ना कपडा अंगभर, ना सुर तक्रारीचे
मायला ठिगळाची साडी
पोरांची हौस भागवून
बाप माझा कणकण झिजतो
भाळावर दुष्काळ घेऊन
खिसा रिकामा तरी, राही आबादानी
प्रा भगवान आमलापुरे
चला मी तुम्हाला परळीला नेऊन आणतो.
ती माझी कर्मभूमी मी थोडं बहुत जाणतो.
नारायण खानसोळे
आमच्या आनंदात
अडसर ठरलेल्या,
संवेदना, तेवढ्या
लोहराकरून
सडकून आण ?
त्या एकदा बोळ
झाल्या की,
आम्ही नाच काय?,
तांडव नृत्य करायला मोकळे.?!!.
विठ्ठल सातपुते
मुक्या दगडाची देवं
नाही नवसा पावली
भरल्या रानातली विहीर
तिच्या मुक्तीस धावली !