जामखेड तालुक्यात अतिवृष्टी नंतर रानडुक्करांचे मोठे संकट, १० एकर हरभरा फस्त,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
अतिवृष्टीने परिसरातील शेतकरी हैराण झालेला असतानाच खरीप पीक पाण्यात गेले असतानाच रब्बी पिकावर वन्य प्राणी विशेषतः रानडुक्करांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू झाला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. घाटमाथ्यावर साकत, दिघोळ, जातेगाव तसेच, खर्डा परिसर, देवदैठण, तेलंगशी, धामणगाव, मोहरी या सह अनेक गावात मोठ्या प्रमाणात उपद्रव आहे.
जामखेड तालुक्यातील दिघोळ गाव शिवारात डुकरांच्या प्रचंड उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी डुकरांनी शेतात शिरून तब्बल १० एकर हरभरा पीक फस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या घटनेत ज्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले त्यामध्ये अंगद चंदू गिते, प्रयाग चंदू गिते, भीमराव दगडू गिते, शारदा भीमराव गिते आणि शिवाजी दगडू गिते या शेतकऱ्यांचा समावेश आहे. सर्वांचे शेत दिघोळ शिवारात असून या सर्वांनी मोठ्या मेहनतीने हरभरा पिकाची पेरणी केली होती.
मात्र, काही दिवसांपासून या भागात जंगली डुकरांचा त्रास वाढला असून वनविभागाने योग्य उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान वाचेल. सध्या शेतकरी रात्री शेतात झोपून पहारा करतो, तरीही डुकरांचा धुडगूस थांबत नाही. भुईमूग, हरभरा, ज्वारी, आणि मका या पिकांचे सतत नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, वनविभागाने तातडीने डुकरांवर नियंत्रण आणावे आणि झालेल्या नुकसानीची पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी. तसेच गावाच्या शिवारात डुकरांना रोखण्यासाठी योग्य तांत्रिक उपाय (फेंसिंग, सापळे, इत्यादी) करण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
या घटनेमुळे दिघोळ परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, आगामी हंगामासाठी पेरणीबाबतही अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.