बारदान्याअभावी महिनाभर बंद असलेले हमी भाव केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांची एकच गर्दी

0
438

जामखेड न्युज——

बारदान्याअभावी महिनाभर बंद असलेले हमी भाव केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांची एकच गर्दी

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे शासकीय हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र बारदाण्याअभावी महिना भरापासून बंद होते. सोमवारी सायंकाळी चार हजार बारदाणा आला यामुळे मंगळवार पासून खरेदी केंद्र चालू झाले. तर खर्डा येथील खरेदी केंद्र रविवार पासून सुरू झाले. सध्या आलेला बारदाणा दोन दिवस पुरेल इतकाच असल्याने खरेदी केंद्र पुन्हा बंद पडण्याची शक्यता आहे. बारदाण्याच्या या संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. महीनाभर शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटापासून सोयाबीन मालाची जपवणूक करावी लागली. यादरम्यान सोयाबीन मालात कमालीची घट दिसून आल्याने शेतकऱ्यांचे मोठे अर्थीक नुकसान झाले. महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये क्विंटलने हमीभाव देऊ अशी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन झाले होते. या पाश्र्वभूमीवर जामखेड तालुक्यात तीन शासकीय हमीभाव खरेदी केंद्र चालू करण्यात आले होते. यामध्ये बाजार समिती, महाकिसान कृषी प्रोड्युसर व चैतन्य कृषी प्रोड्युसर या तीनही सोयाबीन खरेदी केंद्राने २० डिसेंबर अखेर २५ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केले होते. महाकिसानला बारदाणा केंद्राकडून लातूर येथून मिळतो व त्यामध्ये सातत्य राहील्याने ते खरेदी केंद्र चालू राहीले.

दि. २२ डिसेंबर पासून जामखेड बाजार समिती व खर्डा येथील चैतन्य कृषी प्रोड्युसर कंपनी महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन कडून बारदाणा दिला जातो. परंतु राज्यपातळीवरील निर्णयाने बारदाण्याचे टेंडर पुनश्च काढण्यात आले. यासाठी महिनाभराचा कालावधी गेला यामुळे राज्यातील जवळपास २५० खरेदी केंद्रावर बारदाणा एक महिन्याने चालू झाले.

शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद असल्याने शासनाने ६ जानेवारी नोंदीची तारीख वाढवली होती व ३१ जानेवारी अखेर खरेदी करण्याचे ठरवले होते. तसेच खाजगी बारदाणा उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आले परंतु शासकीय नियमात वारंवार होणाऱ्या बदलामुळे खरेदी केंद्राने जोखीम न घेता सोयाबीन खरेदी केंद्र बंद ठेवले. केंद्र सरकारने सोयाबीनचा शासकीय हमीभाव ४८९२ क्विंटलच दर ठरवला आहे. आतापर्यंत सरकारने खरेदी केलेल्या २५ हजार क्विंटल सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. शेतकऱ्याकडे अद्याप मोठ्या प्रमाणावर सोयाबीन असल्याने व अनेकांची पिकपेरा नोंद नसल्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी नियमात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
चौकट
बारदाण्याआअभावी बाजार समितीचे सोयाबीन खरेदी केंद्र महीनाभरापासून बंद होते. आता चार हजार आला पण तो पुरेसा नाही. त्यामुळे मार्केटिंग अधिकारी यांनी मुबलक प्रमाणात बारदाणा उपलब्ध करावा. तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती. त्यामुळे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होणार हे गृहीत धरून शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. आत्तापर्यंत तीस हजार क्विंटलची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आहे. परंतु पिकपेरा नोंद नसल्याने त्यांची नोंद शासनाच्या हमीभाव पोर्टलवर होईना तसेच नोंदीसाठी सातत्याने रेंज नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या नाहीत तरी शासनाने शेतकऱ्यांचे सोयाबीन घेण्यासाठी नियमात बदल करावे सोयाबीन नोंद व खरेदीची मुदतवाढ मिळावी.

 

शरद कार्ले – सभापती बाजार समिती जामखेड

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here