जामखेड तालुक्यात उडान प्रकल्प व पोलीसांनी रोखला बालविवाह, मुलीच्या शिक्षणाला मिळाले कायद्याचे बळ – योगेश अब्दुले
जामखेड तालुक्यातील अरणगावमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या लग्नाची तयारी झाली होती, परंतु ‘उडान’ बालविवाह प्रतिबंधक प्रकल्प व स्थानिक पोलिस आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी वेळेत हस्तक्षेप करून हा बालविवाह रोखण्यात आला.
१२ रोजी अरणगाव येथे नियोजित असलेला एक बालविवाह ‘उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्प’,जामखेड पोलीस आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त आणि प्रभावी हस्तक्षेपामुळे यशस्वीरित्या थांबवण्यात आला आहे. या कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित झाले असून तिला पुढील शिक्षणासाठी कायद्याचे बळ मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अरणगावातील एका कुटुंबाने त्यांच्या मुलीचा विवाह निश्चित केला होता.या संभाव्य बालविवाहाची माहिती ‘उडान’ हेल्पलाईनवर आलेल्या एका गोपनीय फोनद्वारे प्रकल्पाला मिळाली.
माहिती मिळताच बालहक्क कार्यकर्ते योगेश अब्दुले यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि हा बालविवाह थांबवण्यासाठी कार्यतत्परता दाखवली.उडान टीमने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आणि ग्रामविकास अधिकारी विनोद खुरुंगळे यांच्याशी संपर्क साधून बालविवाहाची खात्री केली.
त्यानंतर ‘उडान’चे योगेश अब्दुले,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कदम, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देवडे आणि ग्रामविकास अधिकारी विनोद खुरुंगळे यांनी मुलीच्या पालकांशी थेट संवाद साधला.
त्यांनी पालकांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील तरतुदींची माहिती दिली.या कायद्यानुसार मुलीसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षे आणि मुलासाठी २१ वर्षे असणे बंधनकारक आहे.
तसेच बालविवाह घडवून आणल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे हे स्पष्ट करण्यात आले.‘उडान’च्या कार्यकर्त्यांनी पालकांना बालविवाहामुळे मुलीच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबद्दल समुपदेशन केले. अल्पवयीन वयातील गर्भधारणा, कुपोषण आणि माता-बालमृत्यूचा धोका वाढतो हे त्यांनी समजावून सांगितले.
या यशस्वी हस्तक्षेपानंतर ‘उडान’चे बालहक्क कार्यकर्ते योगेश अब्दुले म्हणाले की;बालविवाह रोखणे हे सामाजिक कर्तव्य आहेच मात्र मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याची पहिली पायरी आहे.’उडान’ प्रकल्प या मुलीला शिक्षण आणि आत्मनिर्भर करण्यासाठी कटिबद्ध आहे.‘उडान’ प्रकल्प आता या मुलीचे शिक्षण पुढे चालू राहण्यासाठी तिला पुन्हा शाळेत दाखल करून सक्षम आणि स्वावलंबी भविष्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.