विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या कडूनपंतप्रधानांना चोंडी भेटीचे निमंत्रण !
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून सहकुटुंब राजधानी दिल्लीच्या दौर्यावर आहेत. प्रा शिंदे यांनी बुधवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. विधानपरिषदेच्या सभापतीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल प्रा शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानत त्यांचे आशिर्वाद घेतले. या भेटीत शिंदे यांनी पंतप्रधानांना चोंडी भेटीचे निमंत्रण दिले आहे.
नागपुर हिवाळी अधिवेशनात प्रा राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती. अधिवेशन संपल्यानंतर प्रा राम शिंदे हे पक्ष नेतृत्वाच्या भेटीसाठी प्रथमच दिल्लीच्या दौर्यावर गेले होते. सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झालेल्या प्रा शिंदे यांनी मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतली होती.
विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी त्यांच्या निवासस्थानी सहकुटुंब भेट घेतली. यावेळी शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
पक्षाने सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील छोट्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल प्रा शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
यावेळी झालेल्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे कुटूंबातील सर्व सदस्यांची अतिशय आपुलकीने संवाद साधला. यावेळी मोदी यांनी शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
सर्व सदस्यांशी त्यांनी दिलखुलास संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने शिंदे कुटूंबातील सर्व सदस्य भारावून गेले होते. यावेळी शिंदे कुटुंबियांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा राम शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे, मुलगी डाॅ अन्विता शिंदे, मुलगी डॉ अक्षता शिंदे, जावाई श्रीकांत खांडेकर, मुलगा अजिंक्य शिंदे हे शिंदे कुटूंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत पार पडलेल्या या भेटीवेळी प्रा राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) या ठिकाणी ३१ मे २०२५ रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे असे निमंत्रण दिले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्विकार केला.