मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संयमी आणि ठाम नेतृत्व

0
320
जामखेड न्युज – – – 
        शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्री होणे काहींना अयोग्य वाटले. मात्र, भाजपसमोर शिवसेना धीरोदात्तपणे उभे राहावी यासाठी आपला मुख्यमंत्री असणे हा त्यांना एकमेव पर्याय वाटला असावा. या निर्णयाचा कस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच आगामी सार्वत्रिक निवडणुकीत लागेल. जनसमान्यांमध्ये ‍संयत, संयमी नेतृत्व म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त…कुणाच्याही ध्यानीमनी नसताना पंतप्रधान झालेले नेते भारताने पाहिले आहेत. अशा काही नेत्यांनी देशाला प्रगतिपथावरही नेले. अलीकडच्या काही वर्षांतले उदाहरण म्हणजे, डॉ. मनमोहन सिंग. महाराष्ट्रातही असेच काहीसे घडले. राजकारणात विशेषत: सत्ताकारणात कोणतेही पद न स्वीकारणाऱ्या ठाकरे घराण्यातील व्यक्तीने मुख्यमंत्रिपद स्वीकारले. उद्धव ठाकरे यांनी केवळ पक्षप्रमुखपदाच्या जबाबदारीत स्वत:ला मर्यादित न ठेवता ते सत्ताकारणात आले अन् थेट मुख्यमंत्री झाले. प्रत्यक्ष राजकारणात यायचे नाही, अशी ठाकरे घराण्याची रीत. आदेश देऊन कारभारावर नियंत्रण ठेवायचे ही महाराष्ट्रावर गारूड करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची खासियत. त्यांच्या प्रत्येक विधानाचे नव्हे, तर शब्दाचेही राजकारणातले मोल प्रचंड. पण त्यांची रिमोट कंट्रोली रीत उद्धव ठाकरे यांनी सोडली. भाजपने समान सत्तावाटपाचा अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. तो पाळला नाही, असे जाहीर करत त्यांनी थेट भाजपला दीड वर्षांपूर्वी ललकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे माजी अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान देणे सोपे नव्हते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही त्यांनी या दोघांना ते लोकप्रियतेच्या शिखरावर असताना शिंगावर घेतले होतेच. यंदा मात्र त्यांनी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला हवेच, हा आग्रह कायम ठेवला अन् महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सहकार्याचा पर्यायी मार्ग तयार करून मुख्यमंत्रीपद उद्धव यांनी खेचून आणले. शिवसेनेचाच मुख्यमंत्री हा शब्द खरा करून दाखवला.
मुख्यमंत्रीपदाच्या या कालावधीला कोरोनाचे ग्रहण लागले. सर्वाधिक संसर्ग झालेल्या राज्यांत महाराष्ट्राचा समावेश होता. परिस्थिती भीषण असताना मुंबईत सनदी अधिकारी बदलणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असले तरी त्यांच्यावर सर्व जबाबदारी टाकून मोकळीक देणे, अशा काही महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे उद्धव ठाकरेंची कारकीर्द यशस्वी ठरते आहे. माझ्या मंत्रिमंडळात सर्वात अनुभवी मंत्री असल्याने ही टॉप परफॉर्मन्सची टीम आहे, असेही ते सांगतात. अर्थात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यशस्वी ठरतात काय ते जोखायला काही काळ जावा लागेल. पक्षप्रमुख म्हणून ते कमालीचे यशस्वी ठरले आहेत हे मात्र खरे.असे घडले राज्याचे नेतृत्वबाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रारंभापासूनच प्रयत्न केला. नवे रूप काळानुसार गरजेचे वाटत असावे. खरे तर उद्धव यांना राजकारणात पूर्वी फारसा रस नव्हता, असे निकटवर्तीय सांगतात. ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र. ‘मार्मिक’ही याच कुळातले नियतकालिक. या दोहोंच्या व्यवस्थापनात लक्ष घालावे, असे बाळासाहेबांनी उद्धव यांना सुचवले. ते मुंबईतील प्रभादेवीच्या कार्यालयात जाऊन बसू लागले. त्यांचे मितभाषी संयमी व्यक्तिमत्त्व लेखक-पत्रकारांना आवडू लागले. त्या काळी राज ठाकरे अवघा महाराष्ट्र पिंजून काढत होते. विद्यार्थी सेना उभी राहत होती. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद चर्चेचा विषय होता. राज स्वत: उद्धव यांनी हा माहोल पाहायला यावे, असा आग्रह धरत. बाळासाहेब आणि मीनाताईंनी तसे सांगावे, असे सेनेतील ज्येष्ठही या दोघांना सुचवत. अखेर उद्धव राजी झाले. मुंबई महापालिकेच्या राजकारणात रस घेऊ लागले. उमेदवारी वाटपात त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देणे सुरू केले अन् टीकेचे मोहोळ उठले. भाऊबंदकीला प्रारंभ झाला. राज यांचे वक्तृत्व प्रभावी, दृष्टी तेज… राजकारणाची आवड. तरीही उद्धव कुठल्याही तुलनेला न घाबरता आपले काम करत राहिले. त्यातच शिवसेनेची त्या काळी ताकद असलेले नारायण राणे सेनेतून बाहेर पडले. उद्धव ठाकरे, त्यांच्यासमवेत सावलीप्रमाणे वावरणारे मिलिंद नार्वेकर रोषाचा विषय ठरले. पण उद्धव ठाकरे यांनी शांत राहणे पसंत केले. विठ्ठलाभोवतालचे बडवे मान्य नाहीत, असे सांगत राज ठाकरेंनी वेगळे नवनिर्माण सुरू केले. अशा स्थितीत कुठेही न डगमगता उद्धव यांनी शांत राहून काम केले. राणेंच्या कोकणात आक्रमक होत भाषण देणे सुरू केले. उद्धव ठाकरे पत्रकारांनाही फिडबॅक विचारत. सुधारणा ठीक ना, असे मिष्कील शैलीत विचारत. त्या योग्यरीतीने अमलात आणत गेले.विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची पाहणी करताना या भागात सोयाबीनचे पीक घेऊन त्याचे तेल काढण्याचे कारखाने काढावेत, पैसा त्यातून मिळेल हे लक्षात आलेला नेता म्हणजे उद्धव ठाकरे. हलाखीला टेकलेला शेतकरी तरारून उभा राहील यासाठी पर्यायी रोजगार उभा करण्याची सूचना करणारा हा एकमेव नेता आहे.
तुमच्या-आमच्यातला मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे एक उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत. वास्तव टिपण्याचे कसब त्यांच्यात आहे. विचक्षण नजरेने जगाकडे पाहणे ही पहिली पायरी त्यांनी केव्हाच ओलांडली आहे. दुसरी पायरी आहे ती वास्तवातल्या त्रुटी बदलून सकारात्मकता देण्याची. चिपळूणच्या बाजारात नागरिक संतप्त झाले असताना शांतपणे ऐकून घेण्याचा, संयत उत्तर देण्याचा मुख्यमंत्र्यांचा स्वभाव नुकताच महाराष्ट्राने पाहिला. असे साधे दिसणारे, तुमच्या-आमच्यातले भासणारे नेते जनतेला भावतात. काळ कठीण असतो तेव्हा जमिनीवरचा नेता आधार देऊ शकतो. या जनभावनेचा योग्य तो वापर करत उद्धव यांना एक आख्यायिका तयार करायची आहे. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात ते वास्तवाला पंख देण्याची कला साधतील. आज ते प्रशासकीय अधिकाऱ्यांत, माध्यमांत त्यांच्या शांत स्वभावाने लोकप्रिय झाले आहेत. त्यांचा फेसबुक लाईव्हवरचा वावर धीर देणारा वाटतो. नुकत्याच झालेल्या एका पाहणीत ते सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here