जामखेड न्युज——
जामखेड शहरात चोरांचा सुळसुळाट, एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या, रोकडसह साडेअकरा लाखांचा मुद्देमाल लंपास
जामखेड शहरात एकाच रात्री तीन दुकाने फोडून रोकड सह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. किसान एजन्सी, ग्राहक सेवा केंद्र व गोळी सेंटर दुकाने चोरटय़ांनी फोडली आहेत. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटनेमुळे जामखेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जामखेड शहरातील बापू सोपान जरे यांच्या किसान एजन्सी मध्ये रात्री चोरांनी हल्ला मारला असून अकरा लाख नऊ हजार रुपये किंमतीचा माल चोरी गेला आहे. यात सुमारे वीस विद्युत पंप तसेच केबलची चोरी झाली आहे. छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला व विद्युत मोटारी व केबल लंपास केलेली आहे. सीसीटीव्ही मध्ये चोरटे कैद झाले आहेत. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
जामखेड खर्डा रस्त्यावर असलेले ग्राहक सेवा केंद्राचे शटरच्या पट्ट्या तोडून अज्ञात चोरटय़ाने रोख ड्राव्हर मधील 16 हजार रुपये रोख लांबवले तसेच या ग्राहक सेवा केंद्राच्या समोर असलेल्या गोळी सेंटर पाठीमागच्या बाजूने फोडून पाच व दहा रूपये रकमेची नऊ हजार रुपयांची चिल्लर चोरून नेली तसेच जामखेड नगर रस्त्यावरील मशिनरी दुकानाचा पत्रा उचकाटून वीज पंप चोरून नेल्याची घटना दि. 25 रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
जामखेड पोलीसात तुषार बापू अनारसे ( रा. भातोडी, ता. आष्टी) यांनी फिर्याद दिली की, जामखेड शहरात जामखेड खर्डा रस्त्यालगत ग्राहक सेवा केंद्र आहे. बुधवार दि. 25 रोजी दिवसभराचे काम आटोपून रात्री सात वाजता भातोडी गावे गेलो व दि. 26 रोजी सकाळी आठ वाजता ग्राहक सेवा केंद्र उघडण्यासाठी आलो असता शटरच्या पट्ट्या तोडलेल्या अवस्थेत दिसल्या व दुकानातील असलेले कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच ड्रॉवरमध्ये असलेल्या शंभर, दोनशे व पाचशेच्या नोटा सर्व मिळून 16 हजार रुपये अज्ञात चोरटय़ाने चोरून नेले.
ग्राहक सेवा केंद्रासमोरच्या बाजूस विशाल दिगांबर पवार (रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) यांचे जय मल्हार गोळी सेंटर आहे. या दुकानाच्या पाठीमागील बाजूने दुकान अज्ञात चोरटय़ांनी फोडून गल्ल्यातील पाच व दहा रूपयाचे नाणे असे एकूण नऊ हजाराची चिल्लर लंपास केली. जामखेड पोलीसात वरील दोन चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत बापू जरे यांचेही गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
चौकट
जामखेड शहरात चोऱ्या लुटालूट अशा घटना वाढल्या आहेत. पोलीसांची भीती कमी झाली कि काय अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. चारच दिवसांपूर्वी व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून लुटण्याचा प्रयत्न झाला होता.