जामखेडकरांनी अनुभवला अभूतपूर्व मातृसन्मान सोहळा. श्रीम.पार्वतीताई इनामदार यांचा अमृतमहोत्सव समारंभानिमित्त,अन्नदान,रक्तदान,वस्त्रदान,ग्रंथदान,वृक्षदान,ज्ञानदान आणि द्रव्यदान विविध कार्यक्रम

0
435

जामखेड न्युज———

जामखेडकरांनी अनुभवला अभूतपूर्व मातृसन्मान सोहळा.

श्रीम.पार्वतीताई इनामदार यांचा अमृतमहोत्सव समारंभानिमित्त,अन्नदान,रक्तदान,वस्त्रदान,ग्रंथदान,वृक्षदान,ज्ञानदान आणि द्रव्यदान विविध कार्यक्रम

शाळेची पायरी न चढलेल्या, परंतु स्वत:च्या मुलाकडून प्रौढवयात साक्षरतेचे धडे घेऊन शेकडो पुस्तकांचे वाचन व अनेक धार्मिक ग्रंथांची पारायणे केलेल्या प्रेरणादायी उत्साहमूर्ती श्रीम. पार्वतीताई विश्वनाथ इनामदार यांचे संघर्षमय जीवन आणि विचार सर्वांसाठीच प्रेरणादायी असून त्यांच्या तीनही अपत्यांनी आयोजित केलेला अभिष्टचिंतन सोहळा राज्याला दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार श्रीक्षेत्र पंढरपूर येथील कृतिशील विचारवंत तथा पालवी प्रकल्पातील ‘अनाथांची माय’ मंगलताई शहा यांनी काढले.त्या महावीर मंगल कार्यालय जामखेड येथे रविवार दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी पाच दिवसीय अमृतमहोत्सव सोहळ्याच्या सांगता समारंभातील तुलादान कार्यक्रमात बोलत होत्या.

श्रीम.पार्वती इनामदार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि.११ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ या पाच दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक ,शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रोज सकाळी ७:३०ते दु.१२:३० या वेळेत ह.भ.प. श्री.विजय म.बागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण करण्यात आले.दि.११ते १३ डिसेंबर २०२४ या काळात रोज सायं.७:०० ते रात्री ९:०० या वेळेत प्रज्ञाचक्षु सद्गुरू श्री.मुकुंदकाका व ह.भ.प.श्री.गोविंद म.जाटदेवळेकर यांची ‘नारदभक्तिसूत्र’ या विषयावर प्रवचनमाला झाली.याशिवाय बुधवार दि.११डिसेंबर रोजी गीताजयंतीनिमित्त ‘गीतायाग’,तर शनिवार दि.१४डिसेंबर रोजी दत्तजयंतीनिमित्त ‘दत्तयाग’ संपन्न झाला. ज्येष्ठ पार्श्वगायक तथा संगीत दिग्दर्शक संतोष कुलट ,प्रसिद्ध तबलावादक शेखर दरवडे,झी टाॅकीज फेम गायक हरिभाऊ काळे, शास्त्रीय गायिका हरिप्रिया जाटदेवळेकर, पार्श्वगायिका उज्ज्वल कुलकर्णी, झी सा रे ग म प फेम ढंगायिका प्रतिक्षा चांदणे ,प्रसिद्ध अभिनेत्री तथा बालकलाकार अनुजा शिंदे व सुप्रसिद्ध निवेदिका डाॅ.धनश्री सरदेशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘भक्तिसंगीत’ कार्यक्रम झाला.

शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी प्रज्ञाचक्षु गोसेवक सद्गुरू श्री.मुकुंदकाका व ह.भ.प.श्री.गोविंद म. जाटदेवळेकर (पाथर्डी),ह.भ.प.सद्गुरू श्री.लक्ष्मण म.पांचाळ (श्रीक्षेत्र केदारेश्वर म्हैसगाव ता.राहुरी) आणि मनोहर इनामदार,उज्ज्वल कुलकर्णी व सविता जोशी या तीनही भावंडांना इ.१ली ते ७वी पर्यंत अध्यापन करणारे आदर्श शिक्षक तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री.तुकाराम कोंडिबा मरभळ(कोळेवाडी ता.राहुरी) यांचा पाद्यपूजन व गुरूसन्मान सोहळा संपन्न झाला.
रविवार दि.१५डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०:३० वा. थोर समाजसेविका मंगलताई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीम.पार्वतीताई इनामदार यांचा अभिष्टचिंतन सोहळा,तुलादान व रक्तदान शिबिर झाले.तुलादानातील साखर,गूळ,तांदूळ आणि रवा (प्रत्येकी ५० कि.ग्रॅम)पालवी प्रकल्पातील एडसबाधित बालकांसाठी तर ग्रंथतुलेतील ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ ग्रंथ अमृतमहोत्सव सोहळ्यात सक्रीय सहभाग घेतलेल्या कलाकार,प्रमुख अतिथी व भाविकांना कृतज्ञता म्हणून समर्पित करण्यात आले.

सदरच्या पाचदिवसीय अमृतमहोत्सव सोहळ्यात ८१ भाविकांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण सोहळ्यात सहभाग घेतला.गीतायाग व दत्तयाग यांमध्ये जामखेड,कर्जत,आष्टी व परांडा तालुक्यातील एकूण १८ दांपत्यांनी योगदान दिले.रक्तदान शिबिरात २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तर प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका व गोविंद म.जाटदेवळेकर यांच्या त्रिदिनी सत्संग संपन. झाला. दत्तजयंतीचे औचित्य साधून दिग्गज कलाकारांच्या भक्तिसंगीताचा आणि जि.प.प्रा.शाळा बांधखडक येथील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने शेकडो भाविक व रसिकांनी लाभ घेतला.यांतील अक्षरा अमोल वारे इ.हिने सादर केलेले ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरीची आजच्या काळातील गरज’ या विषयावरील देवर्षी नारदांच्या वेशभूषेतील कथाकथन,आदिनाथ विजय वारे याने ‘मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय’ हे वेशभूषेसह केलेले सादरीकरण आणि अनुजा शिंदे हिने स्त्रीभ्रूणहत्येवर सादर केलेला गर्भातील मुलीचा ‘आक्रोश’ सर्वांनाच अंतर्मुख करणारा ठरला.
अभिष्टचिंतन सोहळ्यावर आधारित इंदापूर येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका सौ.स्वाती तोंडे यांनी लिहिलेल्या अप्रतिम कवितेचे वाचन दत्तवाडी(धोंडपारगाव) शाळेची माजी विद्यार्थीनी अमृता बळीराम शिंदे हिने केले.
या मातृसन्मान सोहळ्याच्या निमित्ताने विपुल प्रमाणात अन्नदान,रक्तदान,वस्त्रदान,ग्रंथदान,वृक्षदान,ज्ञानदान आणि द्रव्यदान घडल्याने तसेच शेकडो भाविक ,स्नेही,आप्तेष्ट आणि कलारसिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने कृतकृत्य झाल्याची भावना उत्सवमूर्ती श्रीम.पार्वतीताई इनामदार यांनी व्यक्त केली.
या अभूतपूर्व सोहळ्याच्या यशस्वितेसाठी इनामदार,जोशी व कुलकर्णी परिवारातील सर्व सदस्यांसह बांधखडक,धोंडपारगाव,झिक्री,जामखेड व म्हैसगांव ता.राहुरी येथील ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न दिले.

ज्ञानेश्वरी पारायण,रक्तदान, शिबिर, गीतायाग, दत्तयाग , भक्तिसंगीत ,सत्संग, तुलादान इ.कार्यक्रमांचा समावेश

अध्यात्म,साहित्य ,शिक्षण,समाजसेवा व कला इ.क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती

शाल,बुके ,भेटवस्तू इ.सत्कार साहित्याऐवजी इनामदार परिवाराच्या आवाहनानंतर आप्तेष्ट व स्नेहीजनांनी दिले वंचित बालकांसाठी १००हून अधिक स्वेटर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here