दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज – सुनंदा पवार
महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार बाकी असला तरी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष सध्या मुंबईऐवजी दिल्लीतील घडामोडींकडे लागले आहे. कारण दिल्लीत बसलेल्या शरद पवार आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांमध्ये पडद्यामागे हातमिळवणीच्या वाटाघाटी सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. अशातच आता आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
१२ डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी दिल्लीत खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर लगेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान, आता आमदोर रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी मोठं विधान केलं आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
“एका मुलाखतीत सुनंदा पवार यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार आणि खासदार शरद पवार यांच्या भेटीवर बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, मी या भेटीकडे कौटुंबिक भेट म्हणून पाहत आहे. कारण काल पवार यांच्यासाठी महत्वाचा दिवस होता. काल त्यांचा ८५ वा वाढदिवस होता. काल सगळे शुभेच्छा देण्यासाठी तिकडे गेले होते. ही भेट राजकीय आहे का हे मला सांगता येणार नाही, असंही सुनंदा पवार म्हणाल्या.
“कसंही वागले तरीही टीका होत असते. अजित पवार कुठेही गेले तरीही बातम्या होत असतात. ‘दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊ शकतील का? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाल्या, यावर काही सांगता येणार नाही. कुटुंबात मतभेद असतातच, मतभेद मिटतील. भविष्यात एकत्र येऊ शकतात, असं मोठं विधान आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केले आहे.
“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजेत. मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते आणि विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते, त्यामुळे एकत्र राहणे महत्वाचे राहिलं, असंही सुनंदा पवार म्हणाल्या.
“पक्षातील नवे उमदे आमदार निवडून आले आहेत त्यांना जर पक्षाची, संघटनेची जबाबदारी दिली तर पक्ष पुन्हा वाढेल, असंही पवार म्हणाल्या.