—- अन्यथा जामखेड मधील मराठा समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार
मस्साजोग, ता. केज, जि.बीड येथील उमदं व्यक्तिमत्व, मराठा आंदोलक तथा तरूण संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्दयी हत्या केलेल्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा करावी ही केस जलदगती न्यायालयात चालवावी अन्यथा जामखेड तालुक्यातील मराठा समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आज तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून व्देषातून मराठा समाजावर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. त्यातूनच मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथील उमदं व्यक्तिमत्व मराठा आंदोलक तथा तरूण संरपंच संतोष देशमुख यांचे भर दिवसा अपहरण करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे.
सदर घटनेला चार दिवस उलटूनही मुख्य आरोपी आणि राजकिय मुख्य सुत्रधार अजूनही मोकाट आहेत. या विषयी सदर निवेदना व्दारे आम्ही मागण्या करतो की,
१) सदर गुन्ह्यात आरोपी व सहआरोपी म्हणून ज्यांची नावे फिर्यादी यांनी दिली आहेत, त्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी.
२) आरोपींना राजकीय वरदहस्त देणारांना व केजच्या पोलिस निरिक्षक व उपनिरिक्षक यांना निलंबित करून सहआरोपी करण्यात यावे.
३) सदर केस विशेष सरकारी वकील नेमून, फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
४) घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार रविराज देशमुख व मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देऊन कुटुंबाचे पुर्नवसन करण्यात यावे.
आमच्या या मागण्यांची प्रशासनाने गांभिर्याने दखल घेऊन त्याची पुर्तता करावी. अन्यथा अखंड मराठा समाज जामखेड तालुक्याचे वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतर होणारे परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे अखंड मराठा समाजाने मागणी केली आहे.